नगर : कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे अद्याप शाळा सुरु करण्याचा निर्णय झालेला नाही. मागील वर्षाप्रमाणेच शाळा ऑनलाईन सुरु राहणार आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पध्दतीने अध्यापन सुरु राहणार आहे. यामध्ये शाळांमध्ये शिक्षकांनी फक्त ५० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आलेली आहे.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना १४ जूनपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार १५ जून पासून राज्यातील शाळांचे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून करण्यात येत आहे. त्यासाठी शाळांमध्ये व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची उपस्थिती किती असावी, याबाबत अध्यादेश पारीत करण्यात आलेला आहे. यामध्ये इयत्ता पहिली ते नववी पर्यंतचे ५० टक्के शिक्षकांना शाळेत उपस्थिती अनिवार्य करण्यात आलेली आहे, असे शिक्षण विभागाने जारी केलेल्या अध्यादेशात म्हटले आहे.
इयत्ता दहावी व बारावीच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक व प्राचार्य यांना १०० टक्के उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आलेले आहे.
दहावी व बारावीचा निकाल तयार करण्यासाठी मूल्यांकनाचे काम सुरु आहे. मर्यादीत वेळेत हा निकाल घोषित करावयाचा आहे. त्यामुळे राज्यातील दहावी व बारावीला शिकविणाऱ्या शिक्षकांनी १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आलेली आहे.
कोरोनाच्या परिस्थितीमुळे पुढील सूचनेपर्यंत शाळा बंद राहणार असल्या तरी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ऑनलाइन व इतर माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीतपणे सुरु राहणार आहे. याची दक्षता सर्व शाळांच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना घेण्याबाबत सूचना देण्यात याव्यात व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा, असा आदेश प्राथमिकचे शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिला आहे, तसा अध्यादेश जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकार्यांना दिला आहे.
Post a Comment