अमर छत्तीसे
श्रीगोंदा : श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये उपसभापती म्हणून बिनविरोध निवड झाली. पण याचे सर्व श्रेय भाजपच्या वरीष्ठ नेत्यांसह सहकारी सदस्यांचे आहे. त्यामुळे या यशाचे श्रेय कोणी घेऊ नये, असा टोला नवनिर्वाचित उपसभापती मनिषा कोठारे यांनी विरोधकांना लगावला आहे.
कोठारे म्हणाल्या की, श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता होती. पण मध्यंतरीच्या काळात राजकीय कुरघोड्या झाल्या व सत्तांतर झाले. पण त्यानंतर उपसभापती यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसभापती पदासाठी प्रक्रिया सुरू झाली. यात दुसर्यांदा उपसभापती म्हणून बिनविरोध काम करण्याची संधी नेत्यांनी दिली.
यात माजी मंत्री बबनराव पाचपुते, खा. डॉ. सुजय विखे-पाटील, बाळासाहेब नाहाटा, युवा नेते साजन पाचपुते, जेष्ठ नेते लक्ष्मण नलगे तसेच आढळगाव जिल्हा परिषद गटाचे नेते रमेश गिरमकर यांनी केलेल्या मदतीमुळे अशक्य असणारे काम शक्य झाले.
यात पंचायत समितीचे माजी सभापती शहाजी हिरवे, पुरुषोत्तम लगड यांनी मनाचा मोठेपणा दाखवत उपसभापती पदासाठी नाव पुढे केले. हिरवे यांना मिळणारी संधी नाकारुन माझी शिफारस नेत्यांकडे केली. त्यामुळे माझ्या निवडीचे श्रेय घेऊ नये, असे त्या म्हणाल्या.
विरोधकांना संख्याबळ दिसू लागले म्हणून आमच्याच एका सहकार्याला उमेदवारी अर्ज भरायला सांगितले. पण त्या सदस्यांनी देखील मोठेपणा दाखवत आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे माझी बिनविरोध निवड झाली.
पण काही विरोधक चुकीच्या माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करुन आपल्यामुळेच कोठारे यांना संधी दिल्याचा आव आणतात, असेही कोठारे म्हणाल्या.


Post a Comment