माझा नंबर आला तसे माझे सेफ्टी हार्नेस आवळले गेले. तिथून सोडण्यासाठी जयेश सर होते. पुढे ओढण्यासाठी किशोर सर होते. त्यामुळे काळजी कमी होती. पण भीती इतकी होती की शब्दात सांगणे कठीणच.
जयेश सरांनी पुढे होण्यास सांगितले तसे पुढे पाहिले तर पाईप हातात येण्या आधीचे ३-४ फुट म्हणजे क़ाय सांगावे, डाव्या हाताला खोलच खोल दरी तर उजव्या हाताला काहीच नाही. जायचे तर कसे जायचे जयेश सर मार्गदर्शन करत होते. उजवा गुडघा पाईपच्या आतून घालून पाईपवर कसे अंग टाकले काही कळले नाही. पार तत मम झाले.
पण सांगणार कुणाला. पाईपवर झोपलो तेव्हा म्हटले पाईपच्या वरुन झोपून पुढे पुढे सरकत जातो. पण कसा बसा एक फुटच गेलो असेल तेंव्हाच लक्षात आले की हे खुप अवघड आहे. भीतीच्या आकंताने ओरडलो... नाही जमणार मला. परत फुटभर मागे आलो पण परत मागे फिरणे मुश्किल ही नही नामुमकिन था, मग असे ठरवले की पाईपच्या खालून जातो.
मग जयेशने मला पाईप भोवती पायांची आढी घालायला सांगितली आणि हाताची घडी पाईप वरुन अशी मारायची की पलटी मारल्यावर हात सरळ आले पाहिजेत. मित्रांनो या सगळ्या स्टेप्स काही क्षणात कराव्या लागल्या कारण हिम्मत हरायच्या आधी पोझिशन घेऊन पाईप क्रॉस करायचा असतो. कशीतरी पलटी मारली पण ती मारताना एका पायाला चांगल लागल होतं.
कारण ते जे दोन पाईप होते. त्यांना एकत्र ठेवण्यासाठी तीन ठिकाणी जॉइंट होते. आणि ते आडव्या पट्टीने जॉइंट केले होते. पण त्या पट्टीचे टोकं दोन्ही बाजूला बाहेर आले होते. तिथेच मनात भीती वाटली. उलटी पलटी मारल्यानंतर मात्र मी पुढे सरकत होतो. कारण पुढच्या बाजूने किशोर आणि टीम जोरात ओढ़त होते.
निम्म्यात गेलो असेल नसेल तर हाताला इतकी जोरात कळ लागली (मनात म्हटले संपले सारे आता) की मी हाताची कैची सोडून दोन हाताने दोन पाईप पकडले. त्याचवेळी भीतीने नी कण्हत होतो. त्याही परिस्थितीत मी पुढे पुढे सरकत होतो. तर जयेशचा आवाज आला *good-good, very good छान करताय दादा जवळ आले आता v. good* आणि खरच मी पुढच्या टोकाला होतो.
आता परत मला पाय खाली सोडायला सांगितले. पण पाय ठेवायला जागाच नव्हती. कसाबसा कपारीला पाय लावला आता दिशा बदलून स्वतः ला वर खेचायचे होते. पण माझ्या अंगात त्राणच राहिला नव्हता. किशोरने परत एक हिसका देऊन वर खेचले आता थोड़ी बुड टेकवायला जागा होती तिचा आधार आणि किशोरचा जोर दोन्ही एकत्र करून कसातरी वर चढलो आणि त्यांच्या मागे जाऊन मटकन खाली बसलो कारण काही सुधरतच नव्हते. तिथे बसण्यासाठी थोडीच पण व्यवस्थित जागा होती.
हात अजूनही बधीर झाल्यासारखे वाटत होते. थोड्या वेळातच मी जागेवर आलो. मग लक्षात आले की डाव्या हाताच्या मनगटाच्या मागे जोरात काहीतरी लागले आहे. तो पर्यंत बाकीचे मित्रही आले आणि आम्ही पुढे चढायला सुरवात केली. आता एका साखळ दंडाच्या साह्याने १०-१५ पायऱ्या चढलो असेल तर परत समोर आ वासून उभा होता बालेकिल्ल्याचा उंचच उंच सुळका. (क्रमशः)

Post a Comment