नेवासा : नेवासा फाट्यावरील शेवगाव चौकात अहमदनगर औरंगाबाद महामार्गावर राजमुद्रा चौकामध्ये नवीन रस्ता दुभाजकाचे काम करण्यात आले आहे. हे रस्ता दुभाजक चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आल्यामुळे व कोणतेही दिशादर्शक किंवा इतर काहीही फलक न लावल्यामुळे सदर रस्ता दुभाजकावर वारंवार अपघात होत आहेत, हे चुकीचे रस्ता दुभाजक काढून टाकावे अथवा दिशादर्शक व इतर उपाय योजना करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे.
नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकातील कल्पवृक्ष सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याला ठेवण्यात आलेला रस्ता दुभाजक चुकीच्या पद्धतीने लावण्यात आल्याने या रस्त्यावर वारंवार अपघात होऊन अनेक वाहनांचे नुकसान होत आहे.
या रस्ता दुभाजकाची उंची अतिशय कमी असल्याने व कोठेही रेडियम सदृश्य रिफलेक्टर न लावल्याने वाहने दुभाजकावर जात आहेत. तसेच अनेक वाहने एकमेकांवर आदळून भीषण अपघात होत आहेत.
त्यामुळे राजमुद्रा चौक ते कल्पवृक्ष सोसायटी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या दरम्यान बसवण्यात आलेला दुभाजक तात्काळ काढून टाकावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. नगरकडे जाणाऱ्या वाहनांना तसेच कल्पवृक्ष सोसायटीकडे वळणाऱ्या वहानांना अडचण निर्माण झाली आहे.
अनेकदा प्रवाशांना जीवही गमवावा लागला आहे. भरधाव वाहनांमुळे राजमुद्रा चौक मृत्यूचा सापळा बनला आहे. याबाबत वेळीच योग्य निर्णय घेण्याची मागणी होत आहे.

Post a Comment