वृध्देवर अत्याचार प्रकरणातील आरोपीला दहा वर्षाची शिक्षा...


नगर :  ऐंशी वर्षांच्या वृद्ध महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी 21 वर्षीय युवकाला जिल्हा न्यायालयाने बुधवारी 10 वर्षे सक्तमजुरी व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. 

नाना चंदू निकम (वय 21, रा. रतडगाव, ता. जि. अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी बरालिया यांनी हा निकाल सुनावला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरीक्त सरकारी वकील अ‍ॅड. मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले.

दंडाच्या रक्कमेपैकी 15 हजार रूपये पीडितेला देण्याचा व उर्वरीत 10 हजार रुपये सरकार जमा करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. ही घटना मार्च 2020 मध्ये नगर तालुक्यात घडली होती. 

वृध्द महिला सकाळी साडेनऊ वाजेच्या  सुमारास घराजवळच्या विहिरीवरून पाणी भरत असताना आरोपी नाना चंदू निकम याने गलोरीने तोंडावर दगड मारून व तिची मान पिरगाळून तिला खाली पाडले. तिच्या जबरदस्तीने अत्याचार केला.

त्यामुळे महिलेने आरडाओरडा केल्याने तिच्या सुना आल्या. त्यानंतर पीडितेला उपचारासाठी दवाखान्यात नेले. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद झाली होती. या गुन्हयाचा तपास फौजदार धनराज जारवाल यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे सरकारी पंच प्रविण अशोक खेडेकर, फिर्यादी वृध्द महिला, तिची सून, डॉ. प्रसाद सायगावकर, फौजदार नितेश राऊत, धनराज जारवाल, पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष लगड, पोलिस कॉन्स्टेबल संभाजी बोराडे असे एकूण आठ साक्षीदार तपासले. 

खटल्यातील साक्षी पुरावा व युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी निकम याला शिक्षा ठोठावली. या खटल्यात अ‍ॅड. मंगेश दिवाणे यांना पोलिस हेड कॉन्स्टेबल पोपट रोकडे यांनी सहकार्य केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post