नगर : श्रीरामपूर, नेवासें सोनई, भानसहिवरे, शिर्डीत दरोडे टाकून धुमाकूळ घालणाऱ्या आरोपींच्या टोळीला पकडण्यात आलेले आहे. त्यांच्याकडून २७ लाख ९२ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विराज खंडागळे, (वय ३८ रा. बेलापूर बुद्रुक, ता. श्रीरामपूर) यांच्या घरी २३ सप्टेंबरला दरोडा पडला होता. या दरोड्यात दरोडेखोरांनी एकूण दोन लाख ८२ हजाराचा मुद्देमाल लांबविला होता. तसेच सोमनाथ चिंतामणी यांच्या घराचा दरवाजा दरोडेखोरांनी तोडून २५ हजारचा मुद्देमाल लांबविला होता. या दरोड्याचा गुन्हा श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
यापूर्वीही श्रीरामपूर, नेवासे, शिर्डी, शेवगाव या परिसरामध्ये अशा प्रकारचे दरोड्याचे गुन्हे घडलेले असल्याने पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने पोलिस निरीक्षक सुनील कटके यांनी गुन्ह्याचे तपासकामी स्वतंत्र पथक नेमून तपास करुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या.
त्या सुचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, हा गुन्हा हा सलाबतपूर, ता. नेवासे येथील गुन्हेगार सचिन भोसले व त्याचे साथीदारांनी मिळून केलेला असून सचिन भोसले व त्याचा साथीदार अजय मांडवे हे चोरलेले सोन्याचे दागिन्यांची विल्हेवाट लावण्यासाठी पांढऱ्या रंगाचे स्विफ्ट कारमधून आलेले असल्याची खबर मिळाली.
त्यानंतर श्रीरामपूर शहर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सलाबतपूर येथे जावून मिळालेल्या माहितीचे आधारे आरोपीतांचा शोध घेतला. सलाबतपूर ते प्रवरासंगम जाणाऱ्या रस्त्यावरील डॉ. योगेश बरगंटवार यांचे गोठ्याचे आडोशाला एका पांढरे रंगाचे कारजवळ दोन इसम संशयीतरित्या उभे असलेले दिसले.
पोलिस दिसल्यानंतर एकाने उसाच्या शेतात धूम ठोकली. मात्र एकजण मिळून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने स्वतःचे नाव अजय अशोक मांडवे (वय २२, रा. सलाबतपूर, ता. नेवासे) असे सांगितले. त्यास ताब्यात घेऊन त्याची व कारची झडती घेतल्यानंतर कारमधून ४८३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच १०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने मिळून आले.
त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने सचिन भोसले, प्रधुम भोसले, डिच्चन भोसले, बयंग काळे, शेख, (सर्व रा. सलाबतपूर, ता. नेवासे), बाबाखान भोसले, कृष्णा भोसले, (रा. गोंडेगाव, ता. नेवासे), रुकुल चव्हाण, (रा. शिरुर, ता.जि. पुणे), समीर उर्फ चिंग्या सय्यद (रा. मुकिंदपूर, ता. नेवासे), रामसिंग भोसले, (रा. गेवराई, ता. नेवासे), योगेश युवराज काळे (रा. बिटकेवाडी, ता. कर्जत) आदींनी दरोडे टाकल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्यांच्या साथीदारांचा शोध घेतला. प्रथम सुरेश भोसले, समीर उर्फ थिंग्या राजु सय्यद, रामसिंग त्रिंबक भोसले, बाळासाहेब ऊर्फ वयंग सुदमल काळे, योगेश युवराज काळे यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. या प्रकरणातील सहाजण पसार आहेत.
ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून ४८३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, स्विफ्ट कार, ७ मोबाईल व दोन मोटार सायकली असा एकूण २७ लाख ९२ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Post a Comment