नगर ः जिल्ह्यात दैनंदिन 500 ते 800 दरम्यान कोरोना बाधित रुग्ण सध्या आढळून येत आहे व जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट ही 5 टक्केपेक्षा जास्त आहे. यामुळे 10 पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधित असलेल्या गावांमध्ये कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील 11 तालुक्यातील तब्बल 61 गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना 4 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.
कोरोनाची दुसरी लाट जवळपास जिल्ह्यातील बहुतांश भागात संपली असली तरी संगमनेर व पारनेर तालुक्यांतील रुग्ण संख्या अजून कमी झालेली नाही. या दोन्ही तालुक्यांतून प्रशासनाने कोरोना आटोक्यात येण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.
कोरोना रुग्ण संख्या कमी होत नसल्याने मागच्या टप्प्यात पारनेर तालुक्यातील 31 गावांतून लॉकडाऊन करण्यात आला होता. व आता या टप्प्यात संगमनेर तालुक्यासह तब्बल 11 तालुक्यातील 61 गावांतून लॉकडाऊन करण्यात आला आहे.
यामध्ये संगमनेर तालुक्यातील तब्बल 24, श्रीगोंदा तालुक्यातील 9, राहाता तालुक्यातील 7 तर पारनेर तालुक्यातील 6 गावांसह अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर या तालुक्यांतील गावांचा समावेश आहे.
फक्त नगर शहर व नगर तालुका तसेच जामखेड, राहुरी या तालुक्यांतील गावांतून लॉकडाऊनचे पाऊल उचलण्यात आलेले नाही.
Post a Comment