अहमदनगर ः मागील दोन वर्षांपासून प्रशासकीय कारभार अनुभवणार्या नगर अर्बन बँकेची अखेर निवडणूक होणार आहे. केंद्रीय सहकार निबंधकांच्या पत्रानुसार पुण्याच्या राज्य सहकार आयुक्त कार्यालयातील नागरी बँका विभागाचे उपनिबंधक आनंद कटके यांनी नगर अर्बन बँकेची निवडणूक घेण्यासाठी नगरचे जिल्हा सहकार उपनिबंधक दिग्विजय आहेर यांची नियुक्ती केली आहे. यानंतर जिल्हा उपनिबंधक यांनी यादी करण्याच्या सूचना बँकेला दिल्या आहेत.
या नियुक्तीनंतर आहेर यांनी बँकेच्या प्रशासनाला पत्र देऊन बँकेची मतदार यादी मागितली आहे. स्थापनेचे 111 वे वर्ष साजरे करणार्या नगर अर्बन बँकेचा कारभार नेहमी गाजत राहिला आहे. बँकेचे राजकारण, कर्ज वाटपातील गैरव्यवहार व अनियमितता तसेच अन्य काही कारणाने चर्चेत असलेल्या या बँकेचे तत्कालीन संचालक मंडळ दोन वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेने बरखास्त करून बँकेवर प्रशासक नियुक्ती केली आहे.
भाजपचे नगरचे माजी खासदार दिवंगत दिलीप गांधी यांनी वर्चस्व गाजवलेल्या या बँकेवर प्रशासक नियुक्तीनंतर हा विषय राज्यात गाजला होता. मात्र, आता हे प्रशासक राजही संपुष्टात येणार आहे व बँक पुन्हा नवनियुक्त संचालक मंडळाच्या ताब्यात देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
प्रशासक राज, बँकेती गैरव्यवहाराबाबत दाखल झालेले तीन गुन्हे, फरार असलेले काही माजी संचालक, बँकेचा वाढता एनपीए अशा विविध पार्श्वभूमीवरील या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.
Post a Comment