मुंबई : राष्ट्रवादीला आता एकामागून एक झटके बसू लागले आहेत. मध्यरात्री राष्ट्रवादीचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. त्यानंतर आज सकाळी आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 1000 कोटींची संपत्ती जप्त करण्याची नोटीस दिली आहे.
अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर शुगर फॅक्ट्री बाजार मूल्य 600 कोटी, साऊथ दिल्लीमधीली फ्लॅट बाजार मूल्य: सुमारे 20 कोटी, पार्थ पवार यांचं निर्मल ऑफिस बाजार मूल्य: सुमारे 25 कोटी, निलय नावाने गोव्यात बनलेला रिसॉर्ट बाजार मूल्य: सुमारे 250 कोटी, महाराष्ट्रात 27 वेगवेगळ्या ठिकाणी जमीन बाजार मूल्य: सुमारे 500 कोटी या पाच संपत्ती जप्त करण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
आयटीच्या रडारवर अजित पवार हे गेल्या काही महिन्यांपासून आयटीच्या रडारवर आहेत. गेल्या महिन्यात आयकर विभागाने दोन रिअल इस्टेट ग्रुप व अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घर व कार्यालयांवर छापेमारी केली होती.
यावेळी 184 कोटींची बेहिशोबी मालमत्त्ता सापडली होती. आयकर विभागाने 7 ऑक्टोबरपासून 70 हून अधिक ठिकाणांवर छापेमारी केली होती.
अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या मालकीच्या अनंत मर्क्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवरही छापा मारला होता. तसेच पवारांच्या बहिणींच्या मालकीच्या कंपन्यांवरही कारवाई करण्यात आली होती.
दरम्यान, मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूर येथील 70 ठिकाणी आयकर विभागाने धाडी मारल्या होत्या. सात ऑक्टोबरला हे छापे मारण्यात आले होते.
या छापेमारीत बेहिशोबी मालमत्ता आणि काळा पैसा जप्त करण्यात आल्याचे म्हटले आहे. या दोन्ही समूहाकडे 184 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच अनेक महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आले होते.
Post a Comment