नगर : महापालिकेचा नगरसेवक श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. त्याच्या रिक्त जागेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीला स्थगिती छिंदम याने केलेला अर्ज वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश अविनाश कुलकर्णी यांनी फेटाळला आहे.
श्रीपाद छिंदम हा उपमहापौर असताना त्याने महापुरूषाबद्दल अवमानकारक वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून महापालिकेने विशेष सर्वसाधारण सभा घेऊन त्याला उपमहापौर पदावरून बडतर्फ केले होते. त्यानंतर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत श्रीपाद छिंदम याने प्रभाग क्रमांक नऊ (क) मधून निवडणूक लढविली होती.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 13 (1) नुसार ता.27 फेब्रुवारी 2020 रोजी छिंदम याचे नगरसेवक पद रद्द केले होते.
कोरोना संसर्गाची लाट असल्याने या रिक्त जागेवरील निवडणूक लांबणीवर पडली होती. राज्य निवडणूक आयोगाने या रिक्तपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
छिंदम याने अहमदनगर येथील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात रेफरन्स अर्ज (क्र 96- 2021) दाखल करून नगरसेवक पद रद्दचा निर्णय स्थगित करावा तसेच निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी केली होती.
राज्य शासनाच्या वतीने अँड. अनिल ढगे आणि महापालिका प्रशासनाच्या वतीने ऍड. महेश शरद काळे यांनी काम पाहिले. महापालिका अधिनियमातील कलम 12 (2) खालील तरतूद रेफरन्स अर्जास लागू होत नाही.
भारतीय राज्य घटनेचा परिच्छेद 243 झेड.जी. व 329 मधील तरतुदीचा विचार करता निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यावर न्यायालयास हस्तक्षेप करता येत नाही.
सर्वोच्च न्यायालयाचा 2016 मधील शाजी के जोसेफ विरुद्ध व्ही. विश्वनाथ या न्यायनिवाड्याचा संदर्भ तसेच 1952, 1975 आणि 2001 मधील न्याय निवाडे सादर करण्यात आले. न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरून छिंदम याच्या दोन्ही मागण्या फेटाळल्या आहेत.
Post a Comment