तरुणीने रचला अत्याचारा बनाव...


नागपूर :  सर्वांना धक्का बसणारी घटना आहे. एका 19 वर्षीय तरुणीने अत्याचार झाल्याचा बनाव केला आहे. तिने सामूहिक अत्याचाराची तक्रार केली. मात्र, ही तक्रार खोटी होती, हे तपासादरम्यान उघड झाले आहे. 

सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका 19 वर्षीय तरुणीने कळमना पोलीस ठाण्यामध्ये  तक्रार दाखल केली. रामदास पेठ परिसरातून काही आरोपींनी व्हॅनमधून अपहरण केले आणि नंतर कळमना परिसरातील चिखली मैदान या परिसरात नेऊन सामूहिक अत्याचार केला, असे त्या तरुणीने तक्रारीत म्हटले. 

या तक्रारीनंतर नागपूर शहरातील संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली. विविध पोलिस स्टेशनचे अनेक पथक आरोपींच्या शोध कामात लागले होते. पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक  इतर अधिकारी व कर्मचारी सुमारे 1000 पोलीस कर्मचारी आरोपींचा शोध कामात लागले होते.

पोलिसांनी तरुणीने दिलेल्या तक्रारीतील तपशिलानुसार सुमारे 100 ठिकाणांवरचे 250 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा त्या तरुणीचे कोणीही अपहरण केलेले नाही आणि ती सांगितलेल्या घटनास्थळापर्यंत आणि तिथून कळमना पोलीस स्टेशनपर्यंत स्वतः एकटीच गेली आहे, हे सीसीटीव्ही फुटेजच्यामाध्यामातून पोलिसांच्या लक्षात आले.

सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या तपशीलाप्रमाणे तक्रार करणारी तरुणी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास बसने सिताबर्डी परिसरात दाखल झाली होती.  सुमारे एक तास ती सीताबर्डी परिसरात विविध ठिकाणी फिरत राहिली. त्यानंतर ती एका शेअरिंग ऑटोने मेयो रुग्णालयापर्यंत पोहोचली. तिथून एका दुसऱ्या ऑटो ने कळमना परिसरात चिखली मैदान वर  पोहोचली. 

या संपूर्ण प्रवासात तिच्या सोबत कोणीही नव्हतं. कोणीही तिचा अपहरण करण्याचा प्रयत्न केला नाही.  हे सीसीटीव्ही मधून लक्षात आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तिची कसून चौकशी केल्यावर  तरुणीने खोटी तक्रार दिल्याची कबुली दिली.

कुटुंबात सुरू असलेल्या वादातून तिने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना दिली आहे. दरम्यान पोलिसांनी सकाळी तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार अपहरण आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा कळमना पोलीस स्टेशन मध्ये दाखल केला होता. 

आता कायदेशीर प्रक्रियेनुसार तो गुन्हा रद्द केला जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. आता या तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. असे प्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post