अमर छत्तीसे
श्रीगोंदा : दक्षिणेत राष्ट्रवादीने आपली ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या प्रयत्नांना काही अंशी यश आलेले असून श्रीगोंदे पाठोपाठ आता जामखेडमधील कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाले आहे.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे श्रीगोंद्यातील काही समर्थक आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीशी संधान साधन आहेत. काहींनी जिल्हा परिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सत्ता आल्यास उपाध्यक्ष किंवा समितीचे सभापतीपद पदरी पाडून घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
आगामी निवडणुकींमध्ये राष्ट्रवादीचे दक्षिण जिल्ह्यात वर्चस्व रहावे, यासाठी राष्ट्रवादीकडून मोर्चे बांधणी करण्यात येत आहे. मात्र लोकसभेला कोण उमेदवार राहिल, हे अद्याप स्पष्ट नसले तरी दिग्गज या आखाड्यात उतरण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
काहींनी आगामी विधान परिषदेची जागा आपल्याला मिळावी, यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. राष्ट्रवादी दाखल होणाऱ्यांची नावे सध्या चर्चेत आहेत. परंतु स्पष्ट अशा भूमिका काहींनी व्यक्त केल्या नाहीत. परंतु हालचालीवरून तसेच स्पष्ट होत आहे.
विखे गटाचे कट्टर समर्थक जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व मार्केट कमिटीचे माजी सभापती सुधीर राळेभात यांचा समर्थकांसह उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
आणखी काहीजण प्रवेशाच्या तयारीत आहेत. मात्र अद्याप त्या प्रवेशांची तारिख जाहीर झालेली नाही. ती जाहीर व्हावी, अशी अपेक्षा असली तरी त्यांनी घेतलेली वेट अँण्ड वॉच भूमिका महत्वाची ठरणार आहे.
Post a Comment