नवी दिल्ली : देशातील कोरोनाची तिसरी लाट जरी ओसरली असली तरी देखील अद्यापही नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. या व्यतिरिक्त कोरोनाबाधितांचे मृत्यू देखील सुरूच आहेत.
या पार्श्वभूमीवर कोरोना विरोधातील लढाईत केंद्र सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. त्यानुसार देशभरात आता १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठीचे लसीकरण सुरू केले जाणार आहे.
या मुलांना कोरोना लस देण्याचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या बुधवारपासून म्हणजेच १६ मार्चपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांनाही कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. या संदर्भातील माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे.
या वर्षीच्या सुरूवातीला १५ वर्षांवरील मुलांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
आरोग्यमंत्री मांडविया यांनी ट्वीटद्वारे मुले सुरक्षित असतील तर देश सुरक्षित आहे, असे म्हटले आहे. तसेच, ६० वर्षांवरील वृद्धांनाही खबरदारीचा डोस किंवा बूस्टर डोस दिला जाणार आहे. मुलांच्या कुटुंबीयांना आणि ६० वर्षांवरील नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करतो, असे मांडवीय म्हणाले आहेत.
Post a Comment