नगर : संत्री फळबाग घेऊन साडेचौदा लाखांची शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना नगर तालुका पोलिसांनी अटक केली. दोन्ही व्यापाऱ्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली.
वाळकी (ता. नगर) येथील शेतकरी संदीप मधुकर तावरे यांनी पश्चिम बंगालमधील व्यापाऱ्यांना संत्र्यांची विक्री केली होती. संत्र्यांच्या गाड्या भरल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर १४ लाख ५० हजार रुपयाचे आरटीजीएसद्वारे पैसे पाठविल्याबाबत बॅंकेचे संदेश प्राप्त झाले. त्यानंतर संत्र्यांच्या गाड्या महाराष्ट्राबाहेर गेल्यावर संबंधित व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याचे बॅंक अकाउंट होल्ड केले.
अकाउंट होल्ड केल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे बॅंकेमधून काढता आले नाहीत. शेतकरी संदीप मधुकर तावरे यांनी २८ फेब्रुवारी रोजी, फसवणूक झाल्याची फिर्याद नगर तालुका पोलिस ठाण्यात दिली.
त्यानुसार व्यापारी आरोपी अमोल ज्ञानेश्वर फुटाणे (रा. वरुड, जि. अमरावती) व मायनूल इस्लाम करीम इस्लाम (रा. नॉर्थ परगणा, पश्चिम बंगाल) यांच्याविरुद्ध साडे चौदा लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला.
दोन्ही आरोपींना नगर तालुका पोलिसांनी तत्काळ अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
Post a Comment