नगर : नगर शहरासह जिल्ह्यातील मशिदीवरील अनाधिकृत भोंगे हटविण्यात यावे, या मागणीचे निवेदन मनसेच्यावतीने जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलिस अधीक्षकांना देण्यात आले.
याप्रसंगी उपाध्यक्ष मनोज राऊत, अशोक दातरंगे, विनोद काकडे, दिपक दांगट, गणेश मराठे, तुषार हिरवे, गणेश शिंदे, संकेत व्यवहारे, संदिप चौधरी, डॉ.संतोष साळवे, सुमित वर्मा आदी उपस्थित होते.
सचिन डफळ म्हणाले, नगर शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी मशिदीवर अनाधिकृत भोंगे लावण्यात आलेले आहेत. सदर भोंगे हटवण्याबाबतची नगरकरांची जुनीच मागणी आहे. या मशिदीवर लावण्यात आलेल्या भोंग्यांच्या कर्कश आवाजामुळे वृद्ध व लहान मुलांपासून सर्वांनाच अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत आहे.
या भोंग्यामुळे ध्वनी प्रदुषण नियमांचे उल्लंघन होत आहे. त्याबरोबर दोन समाजामध्ये तेठ निर्माण होत आहे. सदर भोंग्यामुळे अनेक ठिकाणी वादविवाद ही तर नित्याची बाब झाली आहे. या आवाजाबाबत तक्रार केल्यास मारहाणीचे प्रकार रोज रोज घडताना दिसून येत आहे.
सुप्रिम कोर्टानेही सदर भोंग्याबाबत निकाल देऊन मशिदेवर भोंगे लावून प्रार्थना करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तरीही या आदेशाचे राजरोसपणे उल्लंघन करण्यात येत आहे. या भोंग्यापसून पोलिस अधीक्षक कार्यालय, तसेच जिल्हा न्यायालय सुद्धा अपवाद राहिले नाहीत.
जितका त्रास आम्ही सर्वच भागातील नागरिक सहन करत आहोत, तेवढाच त्रास शासकीय अधिकारी असूनही सहन करत आहेत. ही खेदाची बाब आहे. त्यामुळे मशिदीवरील भोंगे त्वरीत हटवणे गरजेचे झालेले आहे. हिंदूंना एक न्याय इतर धर्मियांना वेगळा न्याय असे कसे चालू शकते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण देशासाठी एकच घटना लिहिली आहे. त्यामुळे एका समाजला एक न्याय न देता सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे, असे आम्ही मानतो.
याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे या अनाधिकृत भोंगे त्वरीत हटविण्यास या भोंग्यांना प्रतिउत्तर म्हणून शहराबरोबर जिल्ह्यात उत्तर म्हणून हनुमान चालिसाचे पठण सर्व मंदिरे तसेच चौका-चौकातील मशिदीबाहेर सुद्धा आयोजन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे दिला असल्याचे सचिन डफळ यांनी दिला आहे.

Post a Comment