नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत सत्यजीत तांबे विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीने समर्थन दिलेल्या शुभांगी पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला.
विजय दृष्टीपथात असतानाच सत्यजित तांबे यांनी जवळच्या व्यक्तीच्या निधनामुळे आनंदोत्सव साजरा करणार नसल्याचं जाहीर केले होते. त्यानुसार विजयी जल्लोष झालेला नाही.
काँग्रेसकडून एबी फॉर्म न मिळाल्याने अपक्ष अर्ज दाखल केलेल्या सत्यजित यांना भारतीय जनता पार्टीने पाठिंबा दिला. तर आधी भाजपकडून प्रतिसाद न मिळाल्याने अपक्ष म्हणून उभ्या राहिलेल्या शुभांगी पाटील यांना शिवसेनेबरोबर महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी पाठिंबा दिला होता.
त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट झाले होते. सत्यजीत तांबे यांनी पाचव्या फेरीअखेर एकूण ६८ हजार ९९९ मतं मिळवली. तर शुभांगी पाटील यांना फक्त ३९ हजार ५३४ मतांवर समाधान मानावं लागलं. शुभांगी पाटील यांचा तब्बल २९ हजार ४६५ मतांनी पराभव झाला आहे.
Post a Comment