नगर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या. यामध्ये महाविकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत असताना माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना पराभव स्वीकारावा लागला. यावरून एक तर आघाडीत बिघाडी झालीय नाही तर राष्ट्रवादीत फूट पडली हे मात्र समजू शकले नसले तरी घुले यांना नाकारले हे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी अनेक वर्षानंतर घडल्या आहेत. या घडामोडीवरून राष्ट्रवादीला आता आत्मचिंतनाची गरज निर्माण झाली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले विजयी झाले. कर्डिले यांना दहा मते तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना नऊ मते मिळाली. तसेच एक मत बाद झाले. जिल्हा बँकेच्या निवडीमध्ये विखे-पिता पुत्राची खेळी यशस्वी झाली. असे म्हटले जात असले तरी हे म्हणणे चुकीचे आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडले असले तरी आघाडी कायम आहे. या आघाडीत अनेक ठिकाणी बिघाडी होऊन मोक्याच्या जागा भाजपला मिळाल्या आहेत. तसाचकाहीसा प्रकार जिल्हा बँकच्या अध्यक्ष निवडीत झाला आहे. अजित पवार व राष्ट्रवादीला नगरच्या राजकारणामध्ये पुन्हा दणका बसला आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक दोन वर्षापूर्वी २०२० मध्ये झाली आहे. या निवडणुकीत बँकेच्या २१ संचालकांपैकी राष्ट्रवादीचे १०, काँग्रेसचे चार, भाजपचे सहा व एक शिवसेना असे पक्षीय संचालक विजयी झाले.
बँकेच्या निवडणुकीत अध्यक्षपद राष्ट्रवादीला व उपाध्यक्षपद काँग्रेसला दिले होते. त्यावेळी महानगर बँकेचे अध्यक्ष व युवा नेते अॅड. उदय शेळके यांना अध्यक्ष करण्यात आले. परंतु दुदैवाने काही दिवसांपूर्वी प्रदीर्घ आजाराने उदय शेळके यांचे निधन झाल्याने अध्यक्षपद रिक्त झाले.
यावेळीही राष्ट्रवादीचा अध्यक्ष होईल अशी सर्वांना आशा होती. परंतु आशेची निराशा झाली. राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदासाठी प्रशांत गायकवाड, सीताराम गायकर, माजी आमदार राहुल जगताप यांची नावे चर्चेत होती. याबरोबरच माजी सभापती अनुराधा नागवडे यांचेही नाव चर्चेत आले होते.
परंतु घुले यांचे नाव निश्चित झाले. त्यानंतर पक्षांतर्गत व मित्र पक्षात नाराजी वाढली. या नाराजीचा फायदा कर्डेिले व विखे गटाने उठविला. नाराजांना हाताशी धरून कर्डिले यांनी अध्यक्षपदाची संधी मिळवली.
घुले यांच्या कामाच्या पध्दतीला जिल्हा परिषदेत अनेकजण कंटाळलेले होते. अनेकांनी याविषयी उघड नाराजी व्यक्त केली होती. काहींनी पक्षाकडे थेट तक्रारीही केल्या होत्या. पक्षाबरोबरच इतर पक्षाचे झेडपी पदाधिकारी घुले यांच्या कारभारावर नाराज होते. तीच नाराजी बँकेच्या अध्यक्ष निवडीच्या वेळी घुले यांना भोवली आहे. आता घुले यांना आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे.
Post a Comment