जामखेड : माजी मंत्री राम शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती साजरी होत आहे. स्वागताध्यक्ष आमदार राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरू आहे. याच दरम्यान आमदार राम शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या धमकी प्रकरणी जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक तथा जामखेड सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष अमित चिंतामणी यांनी जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संबंधित तरुणाने समाज माध्यमाचा आधार घेत ही धमकी दिली आहे. त्यामुळे जामखेडसह राज्यात खळबळ उडाली आहे.
नगरसेवक अमित चिंतामणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर सुभाष गवसणे रा. पिंपळगाव उंडा, ता जामखेड याच्या विरूद्ध भादवी कलम 504, 505 (2), 506 (2) नुसार जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शिवाजी बोस हे करत आहेत.

Post a Comment