जामखेड : औरंगाबद व उस्मानाबादनंतर आता अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवी नगर केले जाणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या शासकीय जयंती कार्यक्रम चौंडी (ता. जामखेड) येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार राम शिंदे, गोपीचंद पडळकर, मोनिका राजळे, बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजी कर्डिले, सुरेश धस, भीमराव धोंडे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले की आपले सरकार हिंदुत्त्ववादी आहे. त्यामुळे अहमदनगरचे नाव अहिल्यादेवी नगर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा ऐतिहासिक सोहळा आहे. त्याचे साक्षीदार मी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होत आहोत.
अहिल्यादेवी नगर हे नाव देण्याचे भाग्य आम्हाला मिळाले, याचा अभिमान वाटतो. अहिल्यादेवी होळकरांचे नाव मिळाल्याने या जिल्ह्याचे नाव हिमालयासारखे मोठे होईल.
आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी आहे. ती पूर्ण होणार आहे. महाराष्ट्राची भूमी ही रत्नांची खान आहे. या भूमीची वसा-वारसा वाहणाऱ्या रत्नांची ही भूमी आहे. अहिल्यादेवींनी प्रशासकीय कारभाराचा उत्तम आदर्श घालून दिला. त्यांनी सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी मोठे काम केले,असे ते म्हणाले.

Post a Comment