जामखेड : जामखेड तालुक्यात विक्रीसाठी आणलेला गुटखा व सुगंधी तंबाखू टेम्पोतून कारमध्ये भरत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना रंगेहात पकडले. आरोपींकडून सव्वादोन लाख रुपये किमतीचा गुटखा, कार आणि टेम्पो, असा एकूण १४ लाखांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला.
राजू विठ्ठल शिंदे (३०, रा. चौसाळा, जि. बीड), मोहित सुभाष मिसाळ (१९), योगेश सुखदेव खाडे (१९, दोघे राहणार आनंदवाडी, ता. जामखेड), असे अटक केलेल्यांची नावे आहेत.
विनोद तोंडे (रा. जामखेड) याने विक्री करण्यासाठी टेम्पोतून गुटखा मागविला आहे, हा गुटखा तो लोहारदेवी मंदिराजवळ टेम्पोतून उतरून कारमध्ये भरणार आहे, अशी माहिती गुप्त बातमीदारामार्फत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दिनेश आहेर यांना मिळाली होती.
त्याआधारे पथकाने जामखेड येथील लोहारदेवी मंदिर परिसरात जाऊन खात्री केली असताना दोन इसम टेम्पोतून गुटख्याच्या गोण्या उतरून घेऊन त्या आले.
टेम्पोचालक आरोपी राजू शिंदे याच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने हा गुटखा कर्नाटकातून आणला असून, पटोदा येथे ४० गोण्या उतरविल्या. उर्वरित १६ गोण्या आरोपी विनोद छबू तोंडे याने मागविल्या होत्या, अशी कबुली दिली.
ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी, संदीप पवार, पोलिस नाईक सचिन अडबल, रणजित जाधव, शिवाजी ढाकणे, रोहित मिसाळ आदींच्या पथकाने केली.
आरोपींना जामखेड पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पुढील तपास जामखेड पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment