नगर : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वर्धापन दिनाचे औचित्य साधून ९ जून रोजी नगरला मेळावा आयोजित केला होता. उन्हाचा त्रास नको म्हणून हा मेळावा सायंकाळी ठेवण्यात आला होता.
आता, हवामान बदलले असून हवामान विभागाने चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सावध होत राष्ट्रवादी काँग्रेसने हा मेळावा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे.
मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण सन्मान वितरण सोहळ्यात उष्माघातामुळे लोकांचे बळी गेल्याने आता राजकीय पक्षांनी हवामानाची चांगलीच धास्ती घेतली आहे. मैदानातील जाहीर कार्यक्रम घेण्यासाठी सरकारनेही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच संभाव्य दुर्घटना व टीका टाळण्यासाठी राजकीय पक्षही दक्षता घेऊ लागले आहेत.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यात शक्तिप्रदर्शन करण्यासाठी पक्षाने हा मेळावा आयोजित केला होता. नगरसह शेजारच्या जिल्ह्यातील नेत्यांवर त्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. केडगाव येथील मैदानाची जागा निश्चित करून त्यावर तयारीही सुरू करण्यात आली होती.
दोन दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे येऊन तयारीची पाहणी केली होती. आढावा बैठकही घेतली होती. मात्र, हवामान विभागाचा अंदाज आल्याने हा मेळावा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
मेळावा रद्द करण्यात आला नसून पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, पुढील तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे. अर्थात लवकरच पावसाळा सुरू होणार असल्याने मोकळ्या मैदानात कार्यक्रम घेणे कठीण होणार आहे. त्यामुळे यासंबंधी काय निर्णय होतो, याकडे नगरच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment