अमर छत्तीसे
श्रीगोंदा : केंद्र सरकारची "हर घर जल" साठी जलजीवन योजना आणली मात्र याच योजनेवरुन गावोगावी वाद सुरू झाले आहेत. आज आनंदवाडी येथील दोन गट पंचायत समिती समोर उपोषणास बसले आहेत. यावेळी आमदार बबनराव पाचपुते व नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यात आले.
आनंदवाडी येथे जल जीवन योजने अंतर्गत योजना मंजूर आहे पण या योजनेचा सर्वेक्षण करताना तत्कालीन सत्ताधारी व अधिकारी यांनी संगनमत करून गावातील काही वाड्या या योजनेपासून वंचित ठेवल्याचा आरोप करत युवा नेते रमेश गिरमकर, शांताराम भोईटे, सुभाष खोडवे, दादा पाटील नलवडे, अशोक रोकडे, गणेश यादव आदींसह ग्रामस्थांनी उपोषण करत फेर सर्वेक्षण करावे अशी मागणी केली आहे.
माजी सरपंच सुदाम नलवडे, शिवाजी नलवडे मेजर, राहुल गिरमकर, पोपट खामकर आदी ग्रामस्थांनी मंजूर योजनेचे काम तात्काळ चालू करावे, तालुक्यातील इतर गावातील कामे पूर्णत्वास चालले असताना आनंदवाडी येथील काम अद्याप सुरू नाही. या कामात काही राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे तात्काळ हे काम सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी उपोषण करण्यात आले.
दरम्यान आमदार बबनराव पाचपुते व नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन प्रभारी गटविकास अधिकारी व या योजनेचे प्रभारी अभियंता कांगुणे यांच्याशी चर्चा करून या योजनेचा फेर सर्वेक्षण करून वाढीव मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू करावेत, असे सांगितल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

Post a Comment