नगर ः अल्पवयीन मुलीस पळविणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी २४ तासांमध्ये अटक केली आहे. रामेश्वर बाप्पा शिंगोळे (वय १९, रा. पिंपळगाव माळवी, ता. नगर) आणि अनिल सुभाष गोलवड (वय २१, रा. सावेडी नाका, अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
नगर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला पळविण्यात आले होते. या मुलीच्या आईने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, आरोपी रामेश्वर शिंगोळे याने अनिल गोलवडच्या मदतीने मुलीला पळविले आहे. मुलीसह तिघे सध्या आष्टी (जि.बीड) येथे आहेत.
सानप यांनी एक पथक त्या ठिकाणी पाठवून दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून मुलीची सुटका केली. अनिल गोलवड हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरूद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल आहे.

Post a Comment