नेवासा : तालुक्यातील नारायणवाडीच्या उपसरपंच अश्विनी प्रमोद पेटे या सलग आठ महिने विनापरवाना ग्रामपंचायत सभांना अनुपस्थित राहिल्यामुळे अखेर त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई झाली आहे. यामुळे नारायणवाडीत एकच खळबळ उडाली आहे.
राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या नारायणवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच अश्विनी प्रमोद पेटे गेल्या दोन वर्षांपासून ग्रामपंचायत सभांना विनापरवानगी गैरहजर राहत होत्या. यासंदर्भात नारायणवाडी सहकारी सेवा संस्थेचे उपाध्यक्ष अशोक कंठाळे यांनी अॅड. नरेंद्र काकडे व अॅड. किरण मोरे यांच्यामार्फत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ४० ब (१) (२) नुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता.
यावर २६ फेब्रुवारीला सुनावणी होती, मात्र उपसरपंच गैरहजर राहिल्या, लेखीही म्हणणे मांडले नाही. अखेर सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपसरपंच अश्विनी प्रमोद पेटे यांना नारायणवाडी ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्र घोषित केले.
या विरोधात आता पेटे आयुक्तांकडे अपिल करतात की काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या निकालाने नारायणवाडीत राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे.

Post a Comment