नगर ः आंधळ दळतयं अन् कुत्र पीठ खातयं असाच कारभार अहमदनगर महापालिकेचा सुरु आहे. नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतानाही त्याकडे मनपा प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे सध्या नागरिकांना नागरी समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेत पदाधिकारी असताना तीच अवस्था व प्रशासक असतानाही तिच अवस्था असल्याने नागरिकांमधून महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अस्वच्छता दिसून येत आहे. त्यामुळे मतदारांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्वच्छ भारत अभियानात सहभाग घेऊन महापालिकेने यशही मिळविलेले आहे. त्या वेळी तत्कालीन जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांसह महापौर व नगरसेवकांनी विशेष मोहीम शहरात राबविली. त्यामुळे शहराचा कानाकोपरा स्वच्छ झाला. त्या वेळी शहरातील सर्वच भागात कचरा संकलानासाठी गाड्या वेळेत येत होत्या.
मात्र आता परिस्थिती बदलेली आहे. त्या वेळी शहरातील रस्त्यांवर छोटे-मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक व हातगाडीवाल्यांना मनाद्वारे नोटीसा देऊन त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी डस्टबीन ठेवण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्यामुळे स्वच्छता राहत होती. मात्र आता छोटेमोठ्या व्यवसायिकांकडून अस्वच्छता ठेवली जात आहे. त्यांच्या प्रशासनाने त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे.
शहरात ओढे-नाले आहेत. या ओढे-नाल्यांच्या परिसरात काही नागरिक घरातील कचरा आणून टाकीत आहे. त्यामुळे या ओढे नाल्यांच्या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील ओढे-नाल्यांचे श्वास कोंडलेला आहे. तो मोकळा व्हावा, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
शहरात काही ठइकाणी नेहमीच कचरा टाकला जात आहे. अशा परिसरात महापालिका प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. हे पाऊल प्रशासनाने उचलले नाही तर शहर अस्वच्छच राहिल, असे मत नगरकरांमधून व्यक्त केले जात आहे.

Post a Comment