नगर : उत्तरेतील महायुतीच्या राजकीय नेत्यांमधील जिरवाजिरवीच्या राजकारणामुळे माझा पराभव झाला. माझीही जिरली व दक्षिणेत त्यांचीही जिरली. काळेंना कोल्हेंची व विखे-कोल्हेंना एकमेकांची जिरवायची होती. त्यात माझीही जिरली आणि तिकडे दक्षिणेत विखे यांचीही जिरली. पण यातून नेमके काय साध्य झाले? असा सवाल सदाशिव लोखंडे यांनी केला.
जिल्ह्यातील दोन्ही जागांवर महविकास आघाडीने विजयाचा झेंडा रोवला. शिर्डी मतदार संघात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भाऊसाहेब वाकचौरे आणि नगर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके विजयी झाले. दोन्ही ठिकाणी विद्यमान खासदार पराभूत झाले.
शिर्डीत शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे, तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर महायुतीतील बेबनाव समोर आला असून जिरवाजिरवीच्या राजकारणामुळे माझा पराभव झाल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाचे पराभूत उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी दिली.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विधानसभा मतदारसंघातून आणि आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून अकोला व संगमनेरच्या धर्तीवर मताधिक्य मिळाले असते तर माझा विजय नक्की होता. मात्र काळे-कोल्हे परिवारात एकमेकांची जिरवण्याच्या नादात माझी जिरली, असे लोखंडे यांनी म्हटले.

Post a Comment