अजित पवार गटाच्या उमेदवाराचा लाजीरवाणा पराभव

मुंबई ः राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अजित पवार गटातील उमेदवाराचा लोकसभा निवडणुकीत लाजीरवाणा पराभव झालेला आहे. त्यामुळे आता अजित पवार गटाला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने महाराष्ट्रात चार ठिकाणी तर लक्षद्विपमध्ये एका ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी बारामती, शिरूर आणि लक्षद्विपमध्ये दोन्ही राष्ट्रवादीत थेट लढत होती. 

बारामती आणि शिरूरमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवारांचा विजय झाला तर लक्षद्विपमध्ये दोन्ही गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. याठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला. मात्र अजित पवार गटाच्या उमेदवाराला केवळ २०१ मतं मिळाल्यामुळे त्यांचा लाजिरवाणा पराभव झाला आहे.

लक्षद्विप लोकसभेत मागच्या दोन वेळेस संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मोहम्मद फैजल हे खासदार राहिले होते. मात्र मागच्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मोहम्मद फैजल हे शरद पवार गटाबरोबर राहिले होते. यावेळी फैजल तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे गेले. तसेच अजित पवार गटाकडून युसूफ टीपी यांना उमेदवारी देण्यात आली होती. 

या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद हमदुल्ला सईद यांना २५,७२६ मते मिळाली आहेत. तर मोहम्मद फैजल यांना २३,०७९ मतं मिळाली आहेत. तर अजित पवार गटाच्या उमेदवाराला केवळ २०१ मतं मिळाली. या पराभवाची सध्या राज्यभर चांगलीच चर्चा सुरु झालेली आहे. 

अजित पवार गटाने असा कसा उमेदवार उभा केला असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता काहीजण अजित पवार गटाला सोड चिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. आता नेमके कोण कोण सोडते, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post