नगर ः लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना पराभव सहन करावा लागलेला आहे. तसेच महाविकास आघाडीला यश मिळालेले आहे. त्यामुळे आता जिल्हा बॅंकेत अध्यक्ष व उपाध्यक्ष बदल करण्याच्या हालचाली दोन्ही गटांनी सुरु केल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे. आहे. याला मात्र वरिष्ठ नेत्यांनी सहमती दर्शवली नसल्याचे स्पष्ट झालेले आहे.
देशासह राज्यात भाजपची पिच्छेहाट झालेली आहे. राज्यात तर महायुतीची मोठ्या प्रमाणात पिच्छेहाट झालेली आहे. महायुतीच्या अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही जागा गेलेल्या आहेत. त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातून होत आहे.
जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनाही आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहचण्याचे काम कर्डिले यांनी करणे गरजेचे होते. मात्र ते त्यात कमी पडल्यामुळे शेतकरी वर्गाचे कमी मतदान झाल्याची चर्चा भाजप वर्तुळात सुरु आहे.
भाजपमधील अंतर्गत नाराजीचा फटका उमेदवारांना बसलेला आहे. यामध्ये राम शिंदे यांच्या नाराजीचा सर्वाधिक फटका बसला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही नाराजी आता दूर होणे गरजेचे आहे. या नाराजीतून महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झालेला आहे. ही नाराजी आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहिली तर जिल्ह्यातून महायुतीचा सुपडा साफ होईल, असे बोलले जात आहे.
त्यामुळे भाजप जिल्हाध्यक्षासह जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षांसह सर्वच पदाधिकारी निवडी परत बदलाव्यात, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमधून होत आहे. या विषयी आता पक्ष श्रेष्ठी कशी भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोल्हे-काळे व विखे यांच्या जिरवाजिरवी राजकारणामुळे आपला पराभव झाल्याचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी जाहीर वक्तव्य केलेले आहे. त्यावर आता महायुतीचे नेते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उत्तर व दक्षिण मतदारसंघातील जिरवाजिरवीने महायुतीची चांगलीच जिरली असल्याची चर्चा आता जिल्ह्यात सुरु झाली आहे.
जिरवाजिरवीच्या राजकारणाला आगामी काळात वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री बदलणे गरजेचे आहे. अन्यथा आगामी काळात जिल्ह्यातील काही तालुक्यांच्या विकास होणे अशक्य आहे. त्यामुळे आता पालकमंत्री तातडीने बदलावे, अशी मागणी महायुतीच्या पदााधिकाऱ्यांमधून होत आहे.

Post a Comment