नगर ः लोकसभा निवडणुकीचा उडालेला धुऱाळा बसत नाही तोच आता आगामी विधानसभा निवडणुकीचा धुराळा श्रीगोंद्यात उठण्यास सुरवात झालेली आहे. सध्या श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार कोण असणार अशी चर्चा सध्या सुरु झालेली आहे.
यामध्ये महायुतीकडून प्रतिभा पाचपुते किंवा अनुराधा नागवडे यांची नावे चर्चेत येत आहे. सध्या कार्यकर्त्यांमध्ये ही चर्चा सुरु असून पक्षाचे वरिष्ठ नेते फक्त बघ्याचीच भूमिका घेत आहेत.
लोकसभा निवडणुकीत श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला लीड कमी भेटलेले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सर्वाधिक लीड मिळून विजय मिळणे शक्य झालेले आहे. त्याची राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा सुरु आहे.
महायुतीच्या नेत्यांनी प्रचारात सक्रीय सहभाग घेतला असला तरी तो दाखविण्यापुरताच राहिला होता. प्रत्येकाने आपली आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन बाजुलाच राहणे पसंत केले.
श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत आता पाचपुते कुटुंबातून निवडणुकीच्या आखाड्यात कोण उतरणार अशी चर्चा सुरु आहे. सर्व परिस्थिती पहाता सध्या तरी प्रतिभा पाचपुते यांनी निवडणुकीत उतरावे, अशीच अपेक्षा पाचपुते समर्थकांमधून व्यक्त होत आहे. त्यासाठी आता काही कार्यकर्ते पाचपुते यांची भेट घेऊन त्यांना साकडे घालणार आहे.
प्रतिभा पाचपुते यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या गटात अनेक कामे केलेली आहेत. तसेच शैक्षणिक संस्थेतही महत्वाची कामे केलेली आहेत. त्यामुळे संस्थेचे रोपटे वाढत चाललेले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांनीच उमेदवारी करावी, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून मागणी होत आहे.
महायुतीच्या कार्यकर्ते व नेत्यांचीही त्यांच्या नावाला विरोध होणार नाही, अशीच चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे. इच्छूक उमेदवार त्यांच्या कुटुंबियांचा विरोध राहण्याची शक्यता आहे. मात्र इतर कोणाचा विरोध राहणार नाही. त्यामुळे ही निवडणूक पाचपुते यांनी निवडणूक उतरावे, अशी मागणी होत आहे.
माजी सभापती अनुराधा नागवडे यांनी काॅंग्रेसमधून राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून त्यांनाच उमेदवारी मिळेल, अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे. त्यांनाच पक्षाकडून तसा शब्दही मिळाला असल्याची सध्या तालुक्यात चर्चा सुरु आहे.
नागवडे यांनी जिल्हा परिषेदच्या माध्यमातून तालुक्यात विकास कामे केलेली आहेत. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. तसेच काॅंग्रेसमध्ये असताना जिल्हाध्यक्षपदही भूषविलेले आहे. त्याबरोबरच कारखान्याच्या माध्यमातू तालुक्यात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे.त्यामुळे त्यांना आगामी निवडणूक लढविली तर विजय मिळविणे शक्य आहे.
त्यामुळे पक्षाने त्यांनाच उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न करावे, तसेच महायुतीच्या नेत्यांनीही त्यांनाच संधी द्यावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. आता याकडे अजित पवार गट व महायुतीचे नेते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघाची जागाही भाजपची आहे. त्यामुळे या मतदार संघात भाजपाच उमेदवार उभा राहणार असल्याची आता जोरदार चर्चा तालुक्यात आहे. मात्र ही जागा अजित पवार गट आपल्याकडे मिळविणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. त्यामुळे नेमके कोणता उमेदवार राहिल, अशीच चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे.

Post a Comment