अधिकाऱ्यांचा जाच अन् कर्मचार्यांना ताप..

कामकाज करताना एखाद्याकडून जादा चुका होत असतात. चूक झाली म्हणून त्याला सारखेच रागवणे योग्य नाही. किंवा त्यावर कारवाई करणेही योग्य नाही. त्या व्यक्तीकडून चुका का होता, याची कारणे शोधणे हेच वरिष्ठांचे काम आहे. परंतु आपल्याकडे तसे होत नाही. एखाद्याकडून चूक होत असेल तर त्याच्यावर दडपशाही करून तसेच त्यावर कारवाईचा बडगा उगारून त्याचे मनोधैर्य खचविण्याचे काम केले जाते. 


काही वेळेस अशा कर्मचाऱ्यांना आर्थिक झळ देऊन एक प्रकारे त्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रकार कार्यालयांमध्ये होतो. यातून देशात अनेकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. अशा घटना घडल्यानंतर आपण काही दिवस हळहळ व्यक्त करतो. व्यवस्थेत बदलाची मागणी होते. मात्र काही दिवसात सगळ्याचा विसर पडतो. पुन्हा एखादी घटना घडल्यानंतर तीच चर्चा सुरु होते.

जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत यांच्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांचा दबाव होता. त्यामुले संपूर्ण कुटुंब त्या तणावात होते. त्यातूनच राऊत यांच्या पत्नी तथा शासकीय आशादीप महिला वसतिगृहाच्या अधीक्षिका मयुरी राऊत-करपे यांचा मृत्यू झाला, असा आरोप मयुरी यांच्या वडिलांनी केलेला आहे. 

या घटनेतील सत्यता तपासून त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. अशा घटना या अगोदरही राज्यात नव्हे देशात घडलेल्या आहेत. परंतु या प्रकरणात अधिकारी व कर्मचारी संघटनांनी कणखर भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही.

म्हतारी मेल्याचे दुख नाही, परंतु काळ सोकावला नाही पाहिजे, या म्हणी प्रमाणे शासनाने अशा घटनांची गांभिर्याने दखल घेऊन चौकशी करणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये, यासाठी आता सरकारने तातडीने पाऊले उचलून त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. सरकारी, निमसरकारी, खासगी कार्यालयांमध्ये कामकाज करताना जर एखाद्या महिलेला त्रास झाला तर तिला विशाखा समितीच्या माध्यमातून न्याय मागता येतो. तसाच जर त्रास एखाद्या पुरुष कर्मचाऱ्याला झाला तर त्याला न्याय मागता येत नाही. 

तशी कोणतीही त तरतूद नाही. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास होऊनही तो निमूटपणे सहन करावा लागत आहे. काहीजण एक तर नोकरी सोडतात किंवा काहीजण मूत्यूला जवळ करत आहेत. अशा घटना टाळण्यासाठी आता कडक पाऊले उचलणे गरजेचे आहे. जळगाव जिल्ह्यातील या प्रकरणानंतर आता पुन्हा एखादे कुटुंब उध्दवस्त होऊ नये, यासाठी आता सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. 

त्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांच्या सर्वच संघटनांनी एकत्र येऊन लढा उभारून कायदा पारित होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. एकीचे बळ मिळते फळ या म्हणी प्रमाणे सर्वच शासकीय, निमशासकीय व खासगी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आता लढा उभारण्याची गरज आहे. 

त्यातून सर्वांना न्याय मिळून कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्यांना जरब बसण्यास मदत होईल, अन्यथा, अन्याय सहन करून कर्मचारी मृत्यूला जवळ करून त्यांचे कुटुंब उघड्यावर पडत राहील.

सरकारी, निमसरकारी व खासगी कार्यालयात काही ठिकाणी अधिकारी व कर्मचारी यांना टारगेट केले जाते. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांना वरिष्ठांच्या तक्रारी करण्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करून त्या समितीसमोर कर्मचाऱ्यांच्या तक्रारींची सुनावणी होऊन संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे.

शासकीय व निमसशासकीय तसेच खासगी कार्यालयांमध्ये काही अधिकारी फक्त आपल्याला पार्ट्या मिळत नाही, म्हणून कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्याच्या घटना अनेकदा घडत आहेत. या पार्ट्यांसाठी काही कार्यालयात कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याच्या तक्रारीही आहेत. स्वहितासाठी एखाद्याच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार थांबणे गरजेचे आहे.

अधिकारी त्यांच्या तोऱ्यात राहून विशिष्ट एखाद्या कर्मचाऱ्याला त्रास देण्याचे प्रकार घडत असतात. हा त्रास फक्त त्या कर्मचाऱ्याला होत नसतो, तर त्याचे परिणाम त्याच्या सर्व कुटुंबाला भोगावे लागत असतात. 


संबंधित कर्मचाऱ्याबरोबर त्याची पत्नी, त्याची मुले व आई-वडील, भाऊ, बहीण, तसेच सासू-सारे, मेहुणे आदींना होत असतो. त्यामुळे प्रत्येकाने काम करताना आपला कोणाला व्यक्तीगत त्रास होणार नाही हे पाहणे गरजेचे आहे. व्यक्तीगत रागातून एखाद्याला त्रास देणे चुकीचे आहे. 

कार्यालयातील चर्चा कार्यालयात व्हावी, ती घरापर्यंत जाऊ नये, असे प्रत्येकजण म्हणत असतो. अनेकजण कार्यालयात अधिकाऱ्यांकडून होणार्या त्रासाची चर्चा घरापर्यंत करीत नाही. परंतु एखादी अनुचित घटना घडल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना त्याची माहिती झाल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसतो. 


त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कार्यालयातील चांगल्या व वाईट घटना आपले जीवनसाथी किंवा आपल्या घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींच्या कानी घालणे गरजेचे आहे. भविष्यात काही घडना घडल्यास त्यांना सामोर जाताना कुटुंबीयांना मोठी मदत होऊ शकते.

फोडातोडा व राज्य करा या इंग्रजाच्या नितीचा अनेकजण वापर करून राज्य करीत असतात. कर्मचाऱ्यांमध्ये एकी नसल्याने काही अधिकाऱी अशा नितीचा वापर करीत असतात. कुठलाही कामकाजाचा अनुभव नसलेल्या व्यक्ती वरील नितीचा वापर करून अधिकारी म्हणून मिरवत असतात. 

कामकाज करताना ते कर्मचाऱ्यांमध्ये वाद लावून देत असतात. काहींना आपलेस करून इतरांबाबतची माहिती एकत्र करून सर्वांकडून कामकाज करून घेत असतात. हा सर्व प्रकार शासकीय कार्यालयांबरोबर खासगी कार्यालयांमध्ये सुरु आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post