गणेशोत्सवात जिल्हा परिषद सोसायटीतील गणपतीचे आकर्षण

नगर : अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीत सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सोसायटीत श्रींची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली होती. दरवर्षी सोसायटीतील कर्मचारी संतोष हरबा हे गणेशमूर्तीची आगळीवेगळी सजावट करून वेगळ्या रुपात मूर्ती सादर करतात. 


यंदा त्यांनी श्री तुळजाभवानी मातेचा अलंकार असलेल्या सुमारे १० किलो कवड्या वापरून साडे चार फूटाची गणेशमूर्ती साकारली होती.

हरबा यांनी तुळजापूर येथे जावून तब्बल दहा किलो कवड्या आणल्या व त्याचा वापर करीत एक महिना मेहनत करीत त्यांनी मूर्ती सजवली होती. गणपतीची अनोखी सेवा करण्यातून मोठे समाधान मिळत असल्याचे हरबा यांनी सांगितले. विघ्नहर्त्या गणरायांची विविध रुपे प्रत्येकाला मोहित करीत असतात. 

नगरच्या जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीत कनिष्ठ सहायक म्हणून कार्यरत असलेले संतोष शामराव हरबा हे आपले दैनंदिन कामकाज सांभाळून दोन महिने आधीच गणपतीची तयारी करतात. मोठी मूर्ती निवडून ते मूर्तीला वेगळ्या पध्दतीने कल्पकतेने सजवतात. गेल्या २४ वर्षांपासून ते वेगवेगळ्या सजावटीचे गणपती साकारत आहेत.

या उपक्रमाची सुरुवात त्यांनी सन २००१ च्या गणेशोत्सवा पासून केली आहे. गणेशोत्सवात देखावे पाहत असताना एका मंडळाने साकारलेली वैशिष्ट्यपूर्ण गणेश मूर्ती पाहून त्यांनी गणेश मूर्ती सजावटीचा ध्यास घेतला. 

याआधी त्यांनी स्ट्रॉ, डिस्को मनी, थर्माकोल गोळी, कडधान्य, उपवासाचे पदार्थ, लोकर, कुंदनचे खडे, खोबरा किस, गरम मसाला, चहा पावडर, काडेपेटीतील काड्या, चमकी, सुपारी, काचा, मोती, शर्टच्या गुंड्या, १ रुपयांची नाणी तर गतवर्षी १० किलो चिंचोके अशा विविध वस्तूंपासून मूर्ती साकारल्या होत्या.

त्यांनी सजवलेली गणेश मूर्ती तर त्यांच्या एका मित्राने थेट अमेरिकेत नेलेली असून त्याच्या घरात ती स्थापन केलेली आहे. हरबा यांच्या या आगळ्या वेगळ्या छंदाची दखल अनेक संस्थांनी घेतलेली असून त्यांना आज पर्यंत विविध अशा ९ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

दरवर्षी वेगळेपणा जपण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.त्यामुळे यंदा त्यांनी कवड्यांचा वापर करून अतिशय सुंदर व मनमोहक गणेशमूर्ती साकारली आहे. या उपक्रमासाठी त्यांना संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक तसेच सहकारी कर्मचार्‍यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post