आमदार साहेब तालुक्यातील प्रश्न सोडवा... एकदा तरी समस्या जाणण्यासाठी तालुक्यात बैठक बोलवा..




अहिल्यानगर ः
पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील आमदार काशिनाथ दाते यांचे सर्वाधिक लक्ष पारनेर तालुक्याकडे असून अहिल्यानगर तालुक्यातील त्या गावांकडे दु्र्लक्ष झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. आमदार साहेब अहिल्यानगर तालुक्यातील त्या गावांकडेही पहा अशी म्हणण्याची वेळ तालुक्यातील जनतेवर आली आहे.


पारनेर -नगर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत राणी लंके व काशिनाथ दाते, संदेश कार्ले यांच्यासह इतर उमेदवारांमध्ये लढत झाली. यामध्ये काशिनाथ दाते यांनी विजय मिळविलेला आहे. अहिल्यानगर तालुक्यातील जनतेने तालुक्यातील माणसाला डावलून त्यांनी दाते यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. गावांचा विकास होईल, असे सर्वांना वाटत होते. परंतु सर्वांचीच निराशा झाली आहे.

पारनेर-नगर विधानसभा मतदार संघात नेहमीच आमदारांकडून पारनेर तालुक्यालाच झुकते माप मिळालेले आहे. मागील पाच वर्षाचा कालवधी सोडला तर नेहमीच असाच अन्याय झालेला आहे. नीलेश लंके यांनी आमदार असताना नेहमीच अहिल्यानगर तालुक्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तालुक्यातील प्रश्न जाणून घेत त्यांनी ते सोडविण्यावर भर दिलेला आहे. 

लंके यांनी तालुक्यातील प्रश्न सोडविण्यासाठी अहिल्यानगर शहरात संपर्क कार्यालय सुरु केलेले आहे. मात्र विद्यमान आमदार यांचे अद्यापही संपर्क कार्यालय सुरु झालेले नाही. नागरिकांना थेट पारनेरला जावे लागत आहे. त्यामुळे अहिल्यानगर तालुक्यातील जनता चूक झाली आपण दाते यांना निवडून दिले असे म्हणत आहेत. 

सत्कार सोहळे वगळता दाते यांनी अहिल्यानगर तालुक्याकडे फिरकलेले नाहीत. अहिल्यानगर तालुक्यातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी अहिल्यानगरमध्ये आढावा बैठक घेणे अपेक्षीत आहेत. मात्र सहा महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी अद्याप एकही बैठक घेतलेली नाही. तसेच नागरिकांचे असलेले अनेक प्रश्न जाणून घेण्यासाठी जनता दरबार घेतलेला नाही. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात असून आपली चूक झाल्याचे नागरिक म्हणत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post