अहिल्यानगर : राज्यातील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचा वेतन त्रुटी हा प्रश्न चौथ्या वेतन आयोगापासून प्रलंबित आहे. लिपिकांच्या विविध संघटना असूनही आजपर्यंत हा प्रश्न सुटला नाही. वेतन त्रुटीचा प्रश्न निकाली निघण्यासंदर्भात भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल ढुमणे यांना लिपिक कर्मचारी संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी संघाचे संघटन मंत्री राधेश्याम कुलकर्णी, लिपिक वर्गीय कर्मचारी संघाचे पदाधिकारी देविदास उंदरे, दहिफळे, विशाल भिंगारदिवे, समीर वाघमारे, दीपक बनसोडे, कल्पना शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. लिपिकवर्गीय कर्मचारी संघाच्या वतीने अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल ढुमणे आणि राधेश्याम कुलकर्णी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
वेतन त्रुटीचा प्रश्न सोडवण्यासंदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी बैठका आयोजित करण्याबाबत तसेच व्यापक प्रमाणावर लढा देण्यासंदर्भात यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली.
गेल्या सात महिन्यांपूर्वी राज्यातील सर्व लिपिक एकत्र येऊन लिपिक संघ सुरू करण्यात आला. कर्मचाऱ्यांसाठी एक मोठे व्यासपीठ असावे यासाठी महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी संघ यांचे युनिट तयार होऊन भारतीय मजदुर संघाशी संलग्न करण्यात आले.
संपूर्ण राज्यात सुमारे 34 जिल्ह्यांमध्ये लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे ग्रुप असून प्रत्येक ग्रुपवर 500 ते एक हजारपर्यंत अशा मोठ्या संख्येने लिपिक आहेत. सर्व कर्मचाऱ्यांचा वेतन त्रुटी हा एकच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.
कुठल्याही कर्मचारी संघटना शासन मान्यताप्राप्त नाहीत. प्रत्येक संघटनेने वेगळे निवेदन आणि वेगवेगळ्या मागण्या सादर केल्याने आत्तापर्यंत एकमत होऊ शकले नाही आणि वेतन त्रुटीची मूळ मागणी पाठीमागे ठेवून इतर किरकोळ स्वरूपाच्या मागण्या समोर ठेवण्यात आल्या. त्यामुळे हा महत्वाचा प्रश्न पाठीमागे राहिला.
वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या स्थापन होत गेल्या परंतु अजूनही लिपिकांवरील अन्याय दूर झाला नाही. त्यामुळे सर्व लिपीकांनी लिपिकांसाठी एकत्र येऊन हा संघ सुरू करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.
यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील लिपिक वर्ग कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही भारतीय मजदूर संघाच्या छताखाली आलो असून, राज्यस्तरावर आपण मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री आणि विविध खात्याचे मंत्री यांना आपल्या स्तरावरून निवेदन द्यावे आणि लवकरात लवकर बैठक आयोजित करण्यात यावी. सर्व लिपिकांच्या वतीने यावेळी वेतन त्रुटीचा प्रश्न निकाली निघण्यासंदर्भात संघाची कार्यकारणी, कोअर कमिटी तयार करण्यात आलेली आहे.
या माध्यमातून कार्यकारणी जाहीर केलेली आहे. निस्वार्थीपणे आणि स्वखर्चाने सर्व लिपीक या कार्यात सक्रिय होऊन काम करत आहेत. यापूर्वी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये कर्मचारी संघाच्या वतीने नागपूर येथे आंदोलन करण्यात येऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेले आहे. तसेच मुंबई मंत्रालय येथे मुख्यमंत्री कार्यालय, ग्रामविकास मंत्री तसेच इतर विभागाचे मंत्री आणि सचिव यांना निवेदने सादर करण्यात आली आहेत.
ढुमणे यांनी वेतन त्रुटीचा प्रश्न सोडवण्यासंदर्भात मुख्यमंत्री तसेच ग्रामविकास मंत्र्यांची भेट घेऊन प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
Post a Comment