अहिल्यानगर :पंचायत समिती अहिल्यानगरचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव यांनी तत्कालिन निंबळक शाळेतील शिक्षक नेते राजेंद्र निमसे यांना निलंबित करण्यासाठी त्यांच्या वर्गाच्या भाषा विषयाच्या उत्तरपत्रिका ह्या २६ ऑक्टोबर २०२४ला तपासल्या, मात्र त्या उत्तरपत्रिका २५ ऑक्टोबर २०२४ रोजी तपासल्याचे दर्शवून, तपासल्याचा बनावट अहवाल जिल्हा परिषदेस सादर केलेल्या प्रकरणासह त्यांनी पंचायत समिती अहिल्यानगर येथील नस्ती मधून सदर भाषा विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणी अहवाल स्वतः गायब केला आहे. या बनावट अहवालावरून श्री.निमसे यांचे निलंबन करण्यास कारणीभूत ठरलेल्या श्री जाधव यांना सेवेतून निलंबित करण्याची मागणी रिपाई (गवई) ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ यांनी केली आहे .
शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांना ११ नोव्हेंबर २०२५ रोजी मंत्रालय मुंबई येथे निवेदन देऊन श्री जाधव यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे . या निवेदनात म्हटले आहे की तत्कालीन गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव व शिक्षण विस्तार अधिकारी संजय बोबडे यांनी संयुक्तपणे २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निंबळक शाळेस संकलित मूल्यमापन चाचणी - १च्या निमित्ताने भेट दिली.
या भेटीमध्ये श्री जाधव यांनी श्री निमसे वर्गशिक्षक असलेल्या वर्गावरील पर्यवेक्षक यांना सदर चाचणी शासन निर्णयानुसार घेण्यास मज्जाव करण्यात आला .श्री जाधव यांनी चाचणी सोडविताना विद्यार्थ्यांवर दडपण आणले, चाचणी सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ दिला नाही . परिणामी श्री निमसे यांच्या वर्गातील मुलांना भाषा विषयाच्या उत्तरपत्रिका सोडवण्यासाठी शासननिर्णयानुसार मदत न मिळाल्यामुळे या वर्गातील मुलांना उत्तरपत्रिकामधील प्रश्नांचे व्यवस्थि आकलन न झाल्यामुळे मुले गोंधळली.
मात्र त्याच दिवशी निंबळक शाळेतील इतर दहा तुकड्यांच्या वर्गांच्या भाषा विषयाच्या उत्तरपत्रिका ह्या विद्यार्थ्यांकडून शासन निर्णयानुसार सोडवण्यात आल्या .श्री जाधव यांनी श्री निमसे यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांना ही भाषा विषयाची उत्तरपत्रिका सोडविता येऊ नये व त्यांच्या वर्गाची गुणवत्ता ढासळली आहे असे दर्शवून श्री निमसे यांचा असमाधानकारक अहवाल तयार करण्यात यावा म्हणून श्री जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.
निमसे यांना त्यांच्या वर्गाच्या उत्तरपत्रिका घेऊन जाणेबाबत संशय येऊ नये म्हणून श्री.जाधव यांनी अन्य वर्गांच्या उत्तरपत्रिका अनाधिकाराने ताब्यात घेऊन पंचायत समिती कार्यालयात तपासण्यासाठी नेण्यात आल्या .मात्र श्री जाधव यांनी फक्त श्री निमसे यांच्याच वर्गाच्या भाषा विषयाच्या उत्तरपत्रिका तपासून वरिष्ठांना बनावट अहवाल सादर केला व उर्वरित उत्तरपत्रिका ह्या न तपासता पुनश्च निंबळक शाळेतील वर्गशिक्षकांना तपासण्यासाठी परत देण्यात आल्या.
दरम्यान २५ ऑक्टोबर २०२४ रोजी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी निंबळक शाळेत संयुक्त भेट देऊन श्री निमसे यांच्या वर्गाची तपासणी त्यांच्या अनुपस्थितीत प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी केवळ एकट्यानेच पुढील सत्राच्या अभ्यासक्रमावर केली.
मात्र या दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या दिवशीच्या शेरेबुक नोंद वहीमध्ये श्री निमसे यांच्या वर्गाच्या शैक्षणिक गुणवत्तेबद्दल कोणत्याही प्रकारचा प्रतिकूल अभिप्राय नोंदविलेला नाही . उलटपक्षी श्री निमसे यांच्या ३री अ या वर्गातील हातच्याची वजाबाकी ८०टक्के ,हातच्याची बेरीज ७३ टक्के व समजपूर्वक वाचन ५८ टक्के अशी सुमारे ७० टक्के वर्गाची तयारी असतानाही दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणून-बुजून या वर्गामध्ये अप्रगत मुलांचे प्रमाण अधिक असल्याचे गटशिक्षणाधिकारी श्री जाधव यांना जाक्र 561 ने पत्र देऊन दोषारोप ज्ञापन एक ते चार बजावण्याकामी बनावट पत्र काढून निर्देश दिले .
मात्र जिल्हा परिषदेच्या जाक्र आस्था -२/५६० दि २५ ऑक्टोबर २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समिती अहिल्यानगरचे गटशिक्षणाधिकारी यांचा श्री निमसे यांनी शैक्षणिक कर्तव्यात कसूर केली प्रकरणीचा २०२४ च्या प्राप्त अहवालाने श्री निमसे यांना निलंबन आदेश २६ ऑक्टोबर २०२४ रोजी निंबळक शाळेत श्री जाधव यांनी बजावला .म्हणजेच श्री निमसे यांच्या दि २५ ऑक्टोबर च्या निलंबन आदेशामध्ये गटशिक्षणाधिकारी यांच्या अहवालाची तारीख निरंक आहे, त्याअर्थी हा अहवाल दिनांक २५ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हा परिषदेमध्ये पोहोचलेला नव्हता, हे सप्रमाण सिद्ध होते.
तत्पूर्वी श्री जाधव हे त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांसह २५ ऑक्टोबर २०२४ रोजी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे उपस्थित होते. श्री जाधव हे श्री निमसे यांच्या निलंबनाचा आदेश घेण्यासाठी त्याच दिवशी जिल्हा परिषदेमध्ये ते रात्री १० वाजता पोहचले .श्री जाधव यांनी निंबळक शाळेतील श्री निमसे यांच्या वर्गाच्या भाषा विषयाच्या उत्तर पत्रिका ह्या दि २५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत तपासल्याच नव्हत्या. मात्र अत्यंत घाईघाईने तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी श्री जाधव यांच्या बिनतारखेच्या अहवालाने श्री निमसे यांना निलंबित केले. म्हणून श्री जाधव यांनी घाईघाईने शनिवारी २६ ऑक्टोबर २०२४ रोजी साप्ताहिक सुट्टी असून देखील अन्य शाळेतील शिक्षिका सुषमा तरडे ,दिपाली नवले, मेघना गावडे यांना तोंडी सूचनेनुसार बोलावून व त्यांच्याकडून त्या वर्गशिक्षक नसताना देखील बळजबरीने भाषा विषयाच्या उत्तरपत्रिका तपासून घेतल्या .या तिन्ही शिक्षकांनी श्री निमसे यांच्या वर्गाच्या तपासलेल्या भाषा विषयाच्या उत्तरपत्रिकांवर तपासणाराची स्वाक्षरीच केली नाही.
या उत्तरपत्रिका पेन्सीलच्या साहाय्याने तपासल्या ,तसेच शासननिर्णयाचे उल्लंघन करून अर्ध्या गुणाची नोंद उत्तरपत्रिकेत करण्यात आली .या तिन्ही शिक्षिकेंना भाषा विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणी बोलाविणेकामी जाक्र व तारीख टाकून बनावट गोपनीय आदेश तयार करण्यात आले .पंचायत समितीच्या जावक क्रमांक नोंदवही मध्ये श्री जाधव यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात बनावट जावक क्रमांक घुसडले असून त्यांनी शासकीय दस्तऐवजांचा गैरवापर करून त्यामध्ये फेरफार केले आहे .म्हणजेच श्री निमसे यांच्या वर्गाची भाषा विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणी ही बेकायदेशीर व अवैध स्वरूपाची झाली आहे .
तद्नंतर श्री जाधव यांनी घाईघाईने २६ ऑक्टोबर २०२४ रोजी हा अहवाल तयार करून शिक्षणविस्तार अधिकारी संजय बोबडे यांचे मार्फत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कक्ष अधिकारी संभाजी भदगले यांच्या हाती सोमवार दि २८ ऑक्टोबर २०२४रोजी समक्ष देण्यात आला . श्री निमसे यांच्या वर्गाच्या उत्तरपत्रिका २६ ऑक्टोबर रोजी तपासल्या, मात्र हा अहवाल जि प मध्ये जाक्र आस्था -१ /८५४ दि . २५ ऑक्टोबर २०२४ अशी बनावट तारीख व जावक क्रमांक टाकण्यात आला.
जाधव यांनी सादर केलेल्या अहवालामध्ये आस्था-१या कार्यासन नोंदवहीतील जावक क्रमांक ८५४ हा दि १४ ते १८ऑक्टोबर २०२४ दरम्यानचा आहे . व त्या अहवालावर जिल्हा परिषदेच्या ऑफलाइन व ऑनलाईनमध्ये आवक बारनिशीमध्ये नोंद करण्यात आली नाही .तसेच श्री जाधव यांनी आपल्या अहवालाचा बनावटपणा उघड होऊ नये म्हणून पंचायत समितीच्या नस्तीतील भाषा विषय उत्तरपत्रिका तपासणीचा अहवाल ३१ मे २०२४ पूर्वी बदली होण्या अगोदर गायब केलेला आहे .
संचालक,एससीईआरटी, पुणे यांच्या ८ जुलै २०२५ च्या निर्देशानुसार जर संकलित चाचणीमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता कमी आढळली, तरी कोणत्याही शिक्षकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येऊ नये ,असे स्पष्ट निर्देश असताना देखील श्री जाधव यांनी वरिष्ठांच्या निर्देशानुसार शासननिर्णयाचे उल्लंघन करत अशा प्रकारचा अहवाल पाठविता येत नसतांनाही केवळ वरिष्ठांच्या निर्देशनानुसार बनावट जावक क्रमांक व तारीख यांचा वापर करून जिल्हा परिषदेला बनावट अहवाल सादर केला आहे . त्यामुळे श्री निमसे यांचे निलंबन हे श्री जाधव यांनी बनावट स्वरूपाचा अहवाल सादरीकरणामुळे केल्याचे स्पष्ट होते .
या बनावट अहवाल व उत्तर पत्रिका तपासणी अहवाल गायब केल्याप्रकरणी श्री जाधव यांना निलंबित न केल्यास लवकरच मुख्यमंत्री यांच्या मुंबई येथील वर्षा बंगल्यावर उपोषणाला बसण्याचा इशारा विजय शिरसाठ यांनी दिला आहे .

Post a Comment