अहिल्यानगर ः राज्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून मोफत पाठ्यपुस्तके दिली जात असून त्याचा मोठा आधार पालकांना होत आहे. मात्र, अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये खासगी परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुली सुरू असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षांचे सर्व शुल्क जिल्हा परिषद भरत असताना, काही शिक्षक व परीक्षा आयोजकांकडून स्वतंत्र खासगी परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या परीक्षांना ‘सराव परीक्षा’, ‘तयारी परीक्षा’, ‘स्पर्धात्मक मूल्यांकन’ अशी आकर्षक नावे देण्यात येत असून प्रत्यक्षात मात्र या परीक्षा बंधनकारक असल्याचा दबाव विद्यार्थ्यांवर टाकला जात आहे.
विशेष म्हणजे, परीक्षा न दिल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, निकालावर परिणाम होईल किंवा शिक्षकांकडून दुर्लक्ष होईल, अशा भीतीमुळे अनेक पालक नाईलाजाने शुल्क भरत असल्याचे सांगितले जात आहे. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील पालकांसाठी ही बाब अधिकच जाचक ठरत आहे. मोफत शिक्षणाचा उद्देशच अशा प्रकारांमुळे धूसर होत असल्याची भावना पालक व्यक्त करत आहेत.
या संपूर्ण प्रकाराकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी गांभीर्याने पाहणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात मात्र शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने, परीक्षा आयोजक आणि शिक्षण विभागातील काही घटकांची संगनमताची शक्यता पालकांमधून व्यक्त केली जात आहे. ‘आयोजक निर्धास्तपणे परीक्षा घेत आहेत, यामागे कोणाचा आशीर्वाद आहे?’ असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शिक्षण विभागाने मोफत पाठ्यपुस्तकांसह शिष्यवृत्ती, गणवेश यांसारख्या योजनांद्वारे पालकांचा आर्थिक भार कमी करण्याचा प्रयत्न केला असताना, खासगी परीक्षांच्या माध्यमातून होणारी ही वसुली विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी असल्याचे स्पष्ट मत पालक व शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Post a Comment