नेवासे : नेवासे नगरपंचायत निवडणुकीत माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाने दहा जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले असले, तरी फाजील आत्मविश्वास, चुकीची आकडेवारी आणि जमिनीवरील वास्तवाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे गडाख गटाला पूर्ण सत्ता हस्तगत करता आली नाही. संख्याबळ असूनही नगराध्यक्षपद हातातून निसटल्याने या निवडणुकीकडे ‘आत्मविश्वास नडला’ या शब्दांत पाहिले जात आहे.
नेवासे नगरपंचायत निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाला दहा जागा, महायुतीला सहा जागा, तर अपक्षाला एक जागा मिळाली. स्पष्ट बहुमत असूनही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार करणसिंह घुले विजयी झाल्याने गडाख गटाला सत्तेचे संपूर्ण नियंत्रण मिळवता आले नाही. यामुळे पक्षाच्या अंतर्गत यंत्रणा, नियोजन आणि अंदाजपत्रकावर आता उघडपणे टीका होत आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या जागांमध्ये आणखी वाढ होण्याची संधी होती. मात्र गडाख यांच्या यंत्रणेने निवडणुकीपूर्वी केलेली मतांची आकडेवारी आणि मतदारांच्या कलाबाबतचे अंदाज प्रत्यक्ष निकालाशी जुळले नाहीत. हीच चूक यापूर्वी विधानसभा निवडणुकीतही झाल्याचे अनेकांनी अधोरेखित केले आहे. तेथेही आकडेवारीवर अतिविश्वास ठेवण्यात आला आणि जमिनीवरील असंतोषाकडे दुर्लक्ष झाले.
नगरपंचायत निवडणुकीतही त्याच पद्धतीने आकडेवारी मांडण्यात आली. काही प्रभागांत मतदारांमध्ये असलेली नाराजी, अंतर्गत मतभेद, तसेच बदललेली स्थानिक राजकीय समीकरणे यांचा योग्य अंदाज घेतला गेला नाही. परिणामी, अपेक्षित असलेल्या काही जागांवर पक्षाला पराभव स्वीकारावा लागला आणि बहुमत असूनही सत्ता अपुरी ठरली.
विशेष म्हणजे, गडाख यांच्या यंत्रणेला अनेक कार्यकर्ते, स्थानिक नेते आणि राजकीय जाणकारांनी वेळोवेळी सावध होण्याच्या सूचना केल्या होत्या. ‘जमिनीवरची स्थिती वेगळी आहे’, ‘मतदारांचा मूड बदलतो आहे’, अशा इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची चर्चा आहे. आत्मविश्वास हळूहळू अति आत्मविश्वासात बदलला आणि त्याचे परिणाम थेट निवडणूक निकालात दिसून आले.
आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवता, गडाख यंत्रणेने आत्मपरीक्षण करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. केवळ आकडेवारी आणि जुन्या राजकीय अंदाजांवर विसंबून न राहता तळागाळातील कार्यकर्ते, मतदारांचे प्रश्न, स्थानिक असंतोष आणि बदलती समीकरणे यांचा सखोल अभ्यास करूनच पुढील पावले टाकावी लागतील.
एकूणच, नेवासे नगरपंचायत निवडणूक ही क्रांतिकारी शेतकरी पक्षासाठी इशारा देणारी ठरली आहे. बहुमत मिळाले असले, तरी फाजील आत्मविश्वास, चुकीची आकडेवारी आणि तळागाळाकडे दुर्लक्ष केल्यास संख्याबळ असूनही सत्ता पूर्णपणे हातात न येण्याची पुनरावृत्ती होऊ शकते, हेच या निकालातून स्पष्टपणे समोर आले आहे.

Post a Comment