अहिल्यानगर : शासनाच्या आरोग्य योजनांचा गाजावाजा मोठ्या थाटात केला जातो, पण प्रत्यक्षात या योजना रुग्णांपर्यंत पोहोचतच नसल्याचे संतापजनक वास्तव समोर आले आहे. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील अनेक रुग्ण आजही उपचारासाठी पैसे कुठून आणायचे, या प्रश्नाने हैराण झाले आहेत.
कॅन्सरसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांची परिस्थिती तर अधिकच भयावह आहे. लाखो रुपयांचा खर्च परवडत नसल्याने कुटुंबीयांची धडपड सुरू आहे; मात्र शासनाची मदत मिळत नसल्यामुळे अनेकांचे उपचार थांबण्याच्या मार्गावर आहेत. काही रुग्ण उपचाराविना वंचित राहत असल्याचे वास्तव धक्कादायक आहे.
सरकारी मदतीसाठी कागदपत्रांची अट इतकी किचकट ठेवण्यात आली आहे की, रुग्णांच्या नातेवाईकांची अक्षरशः दमछाक होत आहे. एक कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात फेऱ्या मारूनही हातात काहीच पडत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, खासदार आणि आमदारांकडे मदतीसाठी धाव घेतली असता, तेथेही केवळ आश्वासनेच मिळत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्रत्यक्ष मदत मात्र मिळत नसल्याने लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एकीकडे योजना जाहीर केल्या जातात, तर दुसरीकडे गरजू रुग्णांना त्या मिळत नाहीत—यामुळे “योजना फक्त कागदावरच का?” असा थेट सवाल आता नागरिक विचारत आहेत.
प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून ही यंत्रणा सुलभ केली नाही, तर अनेक रुग्णांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता तरी शासन आणि प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

Post a Comment