राहुरी ः देवळाली प्रवरातील ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्नासंदर्भात आरोग्य मंत्र्यांना समक्ष भेटून प्रश्न मार्गी लावू , असे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महाराष्ट्र राज्य तुकडेबंदी संघर्ष समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले.
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न प्रलंबित असून ताे साेडावा, अशी मागणी तुकडेबंदी समितीतर्फे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. त्यावेळी त्यांनी वरील अाश्वासन दिल्याचे ढुस यांनी सांगितले.
या वेळी उपाध्यक्ष तथा डॉ केमिस्टचे अध्यक्ष डॉ. विलास पाटील, कोशाध्यक्ष तथा राहुरी अर्बन निधी संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ काळे, सचिव किशोर थोरात, देवळाली प्रवरा शहर कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब खांदे, देवळाली प्रवरा शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष केदारनाथ चव्हाण, देवळाली प्रवरा शहर शिवसेना पक्षाचे अध्यक्ष सुनीलभाऊ कराळे आदींची स्वाक्षरी असलेले निवेदन तुकडेबंदी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना राहुरी येथे भेट घेऊन निवेदन देण्यात अाले.
या निवेदनात म्हंटले आहे की, देवळाली प्रवरा हे गाव क वर्ग नगरपालिका क्षेत्र असून सण 2011 च्या जनगणने नुसार या गावची लोकसंख्या 30997 इतकी आहे. तसेच या गावाच्या महसूल मंडलास लगतची 42 गावे जोडली गेली आहेत. या सर्व गावांचा देवळाली प्रवरा गावासी विविध कारणास्तव सततचा संपर्क येतो.
देवळाली प्रवरा व त्याच्या महसूल मंडलातील गावांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असताना देवळाली प्रवरा गावच्या जवळपास 20 किलाेमीटर परिघामध्ये अतिदक्षता विभागासारखी अद्यावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही.
सध्या देवळाली प्रवरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. परंतु त्यामध्ये असलेला अपुरा कर्मचारी वर्ग व अपुऱ्या वैद्यकीय सुविधेमुळे येथील नागरिकांना वैद्यकीय सुविधेसाठी सर्वस्वी शेजारच्या शहरांवर अवलंबून राहावे लागते.
येथील सर्वसामान्य जनतेला परवडत नाही. म्हणून या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय होणे अत्यंत गरजेचे आहे, असे निवेदनात म्हटले आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची समक्ष भेट घेऊ व खास बाब म्हणून देवळाली प्रवरा येथे ग्रामीण रुग्णालयास मान्यता मिळवून देऊ, असे आश्वासन मंत्री तनपुरे यांनी या वेळी दिलेले आहे..
Post a Comment