राहुरी : खरीप पिकांचे नियोजन करताना उत्पादन वाढीचे सूत्र समजून घ्या. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करा, पीक उत्पादन खर्च कमी करा, शेतकर्यांनी एकत्र येऊन उत्पादनाचे विपणन करा. या त्रिसूत्रीचा वापर केला तर नक्कीच पीक उत्पादन दुप्पट होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होइल, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भारतीय कृषी अनुसंधान परिषद शेतकरी प्रथम कार्यक्रम व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय ऑनलाईन खरीप हंगाम नियोजन प्रशिक्षण व शेती शाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला अध्यक्षीय मार्गदर्शन करताना संशोधन व विस्तार शिक्षण संचालक ते बोलत होते. यावेळी अटारी पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंग, आयसीएआर -नार्म हैद्राबादचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. पी. व्यंकटेशन, तज्ज्ञ डॉ. आनंद सोळंके, डॉ. एम. पी. देशमुख, डॉ. नंदकुमार कुटे, भारतीय कृषी अनुसंधान परिषद शेतकरी प्रथम प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. पंडित खर्डे, तालुका कृषि अधिकारी, महेंद्र ठोकळे, रायभान गायकवाड उपस्थित होते.
संचालक डॉ. लाखन सिंग मार्गदर्शन म्हणाले की, शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत चिंचविहिरे व कणगर या गावांमध्ये एकात्मिक शेती पध्दतीचा प्रसार व अवलंबन योग्य प्रकारे होत आहे. शेतकरी बांधवांनी पीक उत्पादन वाढीसाठी योग्य तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा वापर करावा.
याप्रसंगी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. पी. व्यंकटेशन म्हणाले की, शेतकरी हा अन्नदाता व भाग्यविधाता आहे. स्त्रीयांचे कृषी उत्पादनांमध्ये मोलाचे योगदान आहे. शेतकरी बंधूंनी नवाचारांचा वापर करुन उत्पादन व उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे.
तालुका कृषी अधिकारी शठोकळे म्हणाले शेतकर्यांनी मृद आरोग्यप्रत्रिकानुसार खतांचा वापर करावा, बीज प्रक्रिया, जैविक खतांचा वापर यावर भर देवून उत्पादन खर्च कमी करावा. यावेळी त्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.
याप्रसंगी प्रमुख समन्वयक डॉ. खर्डे यांनी प्रकल्पांतर्गत केलेल्या कामांची थोडक्यात माहिती दिली व प्रास्ताविक केले. यावेळी प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे डॉ. आनंद सोळंके यांनी खरीप हंगामातील बियाणे निवड यावर मार्गदर्शन केले.
सांगली येथील सोयाबीन संशोधन केंद्राचे सोयाबीन पैदासकार डॉ. एम. पी. देशमुख यांनी सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर आणि कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे यांनी तुर उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन सदाफळ यांनी केले. डॉ. भगवान देशमुख यांनी आभार मानले. या प्रशिक्षण कार्यक्रमाला चिंचविहिरे, कणगर, तांभेरे, कानडगाव व पंचक्रोशीतील शेतकरी ऑनलाईन उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विजय शेडगे, किरण मगर आणि राहुल कोर्हाळे यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment