पाथर्डी : शहरातील प्रभाग क्रमांक सहामध्ये कोरोना चाचणी केंद्र सुरू करून लसीकरण मोहीम राबविण्यात यावे. तसेच शहरात प्रभाग निहाय कोरोना चाचणी व लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अन्यथा मुख्याधिकारी यांच्या दालनात कोणत्याही क्षणी उपोषण करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे प्रशासनास निवेदनाद्वारे देण्यात आला आहेे.
याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रूग्णालय यांना दिलेल्या निवेदन म्हटले आहे की, सध्या लॉकडाऊन असतानाही कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी तसेच कोरोना चाचणी करण्यासाठी नागरिकांना घरा बाहेर पडावे लागत आहे.
त्यानंतर कोरोना लसीकरण व चाचणी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत आहे. या केंद्रांवरील प्रशासनाच्या चुकीच्या व ढिसाळ नियोजनामुळे कोरोना कमी होण्याऐवजी वाढत आहे.
या ठिकाणी गर्दी झाल्यामुळे अनेक नागरिक एकमेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखीनच वाढतो आहे. याच पद्धतीने कोरोनाचे संक्रमण हे कोरोना लसीकरण केंद्रावरही अशा पद्धतीने होणाऱ्या गर्दीमुळे होत आहे. इथेही पहाटे पासूनच नागरिकांची लसीकरणासाठी नंबर लावण्याकरिता झुंबड उडत आहे.
या दोन्ही गोष्टींमुळे कोरोना संक्रमण वाढण्यास हातभार लागत आहे. यामुळे शासनाने लावलेल्या लॉकडाउनला काही अर्थ उरत नाही. काहीच उपयोग होत नाही. जनता मृत्यूला सामोरी जात आहे.
प्रभाग क्रमांक सहामधील आतापर्यंत सुमारे २० नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा आकडा शहरात सर्वात जास्त आहे. त्यामुळे याच अनुषंगाने आम्ही आपणाकडे मागणी करत आहोत.
प्रभाग क्रमांक सहामधील भगवाननगर, फुलेनगर, आसरानगर , शंकरनगर व दत्तनगर गोडावून परिसरामध्ये स्वतंत्र कोरोना चाचणी केंद्र व लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी यावेळी केली.
अशाच पद्धतीची मोहिम ही संपूर्ण शहरभर प्रभागनिहाय राबवावी. त्यामुळे कोरोना लसीकरण व कोरोना चाचणी केंद्रावर गर्दी होणार नाही.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जाईल व आरोग्य विभाग तथा पालिका कर्मचाऱ्यांवरील ताणही यामुळे पर्यायाने हलका होईल. आमच्या मागणीचा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन अंमलबजावणी करावी अन्यथा मनविसेच्या वतीने कोणत्याही क्षणी लॉकडाउनचे सर्व नियम पाळून मुख्याधिकारी यांच्या दालनात उपोषण करण्यात येईल. त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पालिका प्रशासनाची असेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष किरण पालवे, मनसे विधी व जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रविण वाघमारे, विनय बोरूडे आदी उपस्थित होते.
Post a Comment