नगर : जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव संपवण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधक उपाययोजनांची गती वाढवली आहे. सर्वसमावेशक प्रयत्नांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता गावपातळीवर काळजी घेतली जात आहे. प्रत्येक गावात आता हिवरे पॅटर्न राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज (शुक्रवारी) तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, मुख्याधिकारी यांच्याशी त्यांनी वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना व त्याची तालुका व ग्रामपातळीवर होत असलेली अंमलबजावणी याबाबत संवाद साधला.
यावेळी आदर्श गाव समितीचे अध्यक्ष तथा हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिल पोखर्णा, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले व पद्मश्री पोपटराव पवार तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी 13 व 14 मे ला जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील यांच्याशी दिवसभरात दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला होता.
यावेळी आदर्श गाव हिवरे बाजारने कोरोना मुक्तीसाठी गावामध्ये केलेल्या उपाययोजना, रुग्णांचे विलगीकरण याची माहिती पवार यांनी सर्व सरपंच व ग्रामसस्तरीय अधिकारी यांना दिली होती.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी हाच हिवरे बाजार पॅटर्न जिल्ह्यातील सर्व गावात राबविण्याचे ठरविले आहे. तशा सूचना आज त्यांनी सर्व तहसीलदार व तालुकास्तरीय यंत्रणांना दिल्या आहेत.
Post a Comment