तेल्या रोगाच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने सुचविल्या विविध उपाययोजना... कृषी विभागाकडून डाळिंब फळबागांची पाहणी...


नगर : डाळिंब पिकावर (तेल्या रोग) जीवाणूजन्य करपामुळे शेतकर्‍यांनी डगमगून जाऊ नये. हा करपा उपाययोजना केल्यानंतर नियंत्रणात येतो. यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून विविध उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच जैविक बुरशीनाशके वापरण्याबाबत उपाययोजना करण्याचे आवाहन शेतकर्‍यांना करण्यात आले आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले यांनी दिली.

नगर तालुक्यातील अरणगाव (शिंदेवाडी), खंडाळा व बाबुर्डी येथील डाळिंब बागांची नवले यांनी पाहणी करून तेल्या रोगाविषयी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. 

यावेळी मंडल कृषी अधिकारी जगदीश तुंभारे, कृषी पर्यवेक्षक जालिंदर गांगुर्डे, कृषी सहाय्यक उमेश शेळके, डाळिंब उत्पादक शेतकरी किसन लोटके, गणेश शिंदे, बन्सी शिंदे, शरद टकले, विक्रम वाळके आदींनी डाळिंब पिकावरील तेल्या रोगाच्या नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करून उपाययोजना सूचविल्या.

नवले म्हणाले की, नगर तालुक्यात सुमारे 950 हेक्टरवर, तर अरणगाव, खंडाळा व बाबुर्डी येथे सुमारे 200 एकरमध्ये डाळिंबाची लागवड करण्यात आलेली आहे. जैविक बुरशीनाशकांचा वापर केल्यास कमी खर्चात तेल्या रोग नियंत्रणात येईल. 

मागील 14 वर्षांपासून येथील शेतकरी डाळिंबाचे पिक घेत आहेत. ते अनुभवी आहेत. दर्जेदार डाळिंबाचे उत्पादन त्यांनी घेतले आहे. हवामानातील बदल, ढगाळ वातावरण, हवेतील आर्द्रता यामुळे नवीन 1 ते दीड वर्षे लागवड झालेल्या पिकावर या रोगाचा फांदी व खोडावर प्रार्दूभाव दिसून आल्यामुळे कृषी विभागाने उपाययोजना सूचविल्या आहेत, असे ते म्हणाले.

कृषी विभागाने सूचविलेल्या उपाययोजना करून आपण डाळिंबावरील तेल्या रोगाचे व्यवस्थापन करू शकतो. डाळींबावरील विविध समस्यांपैकी तेल्या रोग (बॅक्टेरियल ब्लाईट) ही मोठी समस्या आहे. रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक रोग नियंत्रण पद्धतीचा वापर करावा. 

रोगाची ओळख - डाळिंबावर बॅक्टेरियल ब्लाईट रोग (तेल्या) हा जिवाणूजन्य असून, झॅन्थोमोनास अक्झानोपोडीस पीव्ही पुनीकिया जीवाणूमुळे होतो. रोगाची लक्षणे - याचा प्रादूर्भाव पाने, फुले, खोड व फळांवर होतो. सुरुवातीला पानावर लहान तेलकट किंवा पानथळ डाग दिसतात. 

उन्हात हे डाग बघितले की तेलासारखे चमकतात. फुलांवर व कळ्यांवर गर्द तपकिरी व काळपट डाग पडतात. पुढे यामुळे फुलांची व कळ्यांची गळ होते.  खोड व फांद्यांवर सुरुवातीला काळपट वा तेलकट डाग गोलाकार दिसतात. फळांवर सुरुवातीला एकदम लहान आकाराचे पानथळ तेलकट डाग दिसतात. 

कालांतराने हे डाग तपकिरी काळपट दिसून व त्यावर भेगा पडतात. फळांवर या डागांमुळे आडवे-उभे तडे जातात. तडे मोठे झाल्यावर फळे इतर कारणाने सडतात आणि गळून पडतात. जीवाणूंची वाढ 28 ते 32 अंश सेल्सिअस तापमान, तसेच वातावरणातील आर्द्रता 80 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास झपाट्याने होते. 

बागेत किंवा बागेशेजारी तेलकट डाग रोगाचे अवशेष असणे. ढगाळ व पावसाळी हवामान, वादळी पाऊस व वातावरणातील आर्द्रता जास्त असणे. फळ हिरव्या रंगांच्या अवस्थेत असताना लवकर प्रादूर्भाव होतो. या बाबी रोगासाठी अनुकूल आहेत.

एकात्मिक रोग नियंत्रणासाठी बहार धरताना जमिनीवरील रोगट जीवाणूंची संख्या कमी करण्यासाठी ब्लिचिंग पावडर झाडाखाली भुकटी हेक्टरी 20 किलो धुरळावी. 

झाडाच्या फांद्या प्रादूर्भाव झालेल्या भागाच्या 2 इंच खालून छाटाव्यात. छाटणी करताना कात्री प्रत्येकवेळी एक टक्के डेटॉलच्या द्रावणात निर्जंतुक करून घ्यावी. 

पानगळ व छाटणीनंतर बॅक्टेरियानाशक (500 पीपीएम)/ बोर्डोमिश्रण (एक टक्के) यांची फवारणी करावी. रोगाचा प्रादूर्भाव झाल्यास खालील 4 फवारण्या 5 दिवसांच्या अंतराने कराव्यात. पहिली फवारणी - कॉपरहायड्रॉक्साईड 2 ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसिन 0.3 ग्रॅम + ब्रोनोपॉल 0.5 ग्रॅम + सर्फेक्टंट 0.5 मि.लि/लिटर, दुसरी - कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम + स्ट्रेप्टोमामसिन 0.3 ग्रॅम + ब्रोनोपॉल 0.5 ग्रॅम + सर्फेक्टंट 0.5 मि.लि/लिटर, तिसरी - कॉपर ऑक्झिक्लोराईड 2.5 ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसिन 0.3 ग्रॅम + ब्रोनोपॉल 0.5 ग्रॅम + सर्फेक्टंट 0.5 मि.लि/लिटर, चौथी - मँकोझेब (75%) 2 ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसिन 0.3 ग्रॅम + ब्रोनोपॉल 0.5 ग्रॅम + सर्फेक्टंट 0.5 मि.लि/लिटर. 

या औषधांची फवारणी फळ काढणीच्या 30 दिवसापूर्वी व पावसाळी हंगामात ही फवारणी फळ काढणीच्या 20 दिवसांपूर्वी बंद करणे आवश्यक आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post