राज्यात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत आहे. दूध उत्पादकांनाही त्याचा फटका सहन करावा लागत आहे. संघर्ष हा नेहमीच त्याच्या पाचवीला पुजलेला आहे.
दुधाचे दर कमी झाले तर दुधापासून तयार होणारे उपपदार्थ पेढे, श्रीखंड, दही, ताक, लस्सी यांच्या किंमती कमी का होत नाहीत. तसेच पशुखाद्य, औषधे यांच्या किंमतीही दुधाचे दर कमी झाले तर कमी होत नाहीत. हिच मोठी शोकांतिका आहे.
प्रत्येक वेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांनीच झळ का सोसायची? आज दुधाचे दर 20 ते 23 रुपये प्रति लिटरपर्यंत खाली आले आहेत. परंतु हेच दूध ग्राहकांना खरेदी करण्यासाठी 40 ते 44 रुपये मोजावे लागतात ही वस्तुस्थिती आहे. यात खूप मोठी तफावत आहे.
दुधाचे दर घसरल्यामुळे जनावरांच्या किंमतीही कमी झाल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी देखील दुधाचे हेच दर होते. मग पेट्रोल,डिझेल, खाद्यतेल यांच्या किंमती मात्र गगनाला भिडल्या आहेत. दूध व शेतमालाला मात्र भाव नाही. या सर्व परिस्थितीशी संघर्ष करताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
आज टिकाऊ माल असलेले दुकानदार लॉकडाउनमुळे पोटपाण्यासाठी ओरडत आहेत.
बळीराजा मात्र नाशवंत माल असून देखील संघर्ष करतो आहे. याचा नक्कीच मला अभिमान वाटतो. आपल्या उत्पादीत वस्तूंची विक्री किंमत घटू नये, म्हणून अनेक कंपन्यानी आपल्या वस्तूंचे वजन व आकारमान दिवसेंदिवस कमी करत आहे. किंमतीही वाढविल्या आहेत. त्याप्रमाणे शेतकऱ्यांचा 100 किलोचा क्विंटल80 किलोचा करायला काय हरकत आहे?कृषीप्रधान अर्थव्यवस्थेत शेतकरी आर्थिक दृष्टीने सक्षम आहे काय ? याचा सरकार व जबाबदार घटकांनी नक्कीच विचार करावा.
असंख्य दुःखाचे काटे आहेत त्याच्या वाटेवर...सरकारला काय माहित त्यासाठी किती भेगा पडतात शेतकऱ्यांच्या टाचेवर...!
बाळासाहेब भोर, युवक अध्यक्ष,अखिल भारतीय क्रांती सेना, संगमनेर.
Post a Comment