आई ही आईचं असते.... तिला कितीही कष्ट पडले तरी मुलांसाठी कधीच थकत नसते. अहाे रात्र ती मुलांसाठी झडत असते. तिच्या श्रमाचे महत्व आपल्या कृतीतून पटवून देत असते. तिची अपेक्षा एकच असते. आपल्या मुलांनी शिकवून माेठं व्हावं. त्यांच्या पायावर उभ रहावं. बाकी तिची अपेक्षा तशी काहीचं नसते. विना अपेक्षा ती आपल्या लेकरांसाठी झडत असते.
आई तिच्या श्रमाचे महत्व आपल्या कृतीतून पटवून देत असते. तिला शेतातील असो की घरातील ,स्वयंपाक असो की विणकाम, शिवणकाम, नातवंडांचा मेकप असो की आजारी माणसांची सेवा असो प्रत्येक काम तितकेच कौशल्याने, टापटीपिने करणारी अशी माझी प्रेमळ कष्टाळू आई.
तिचे कष्ट अपार आहे. तिच्या कष्टांची महत्व आज आम्हाला संसाराचे आेझे खांद्यावर पडल्यावर आईचे महत्व समजतं आहे. तिने आमच्यासाठी साेसलेल्या प्रत्येक कष्टाची जाणीवर आता आम्हाला हाेतं आहे. तिच्या कष्टाचं आम्ही शिकवून खरचं चिज केले याचे मनाला समाधान मिळतं आहे.
सुदैवाने गृहिणीच्या कामांचे गुणांकन झाले तर पैकीच्या पैकी गुण मिळतील, असे काम करणारी माझी आई. तीन वर्षांपूर्वी ओपन हर्ट सर्जरी झाली आहे. त्या आजाराचा जराही बाऊ न करणारी अशी माझी सोशिक व कार्यमग्न आई. तिच्या वागण्यातून प्रत्येक नात्याचा आब राखला जातो. तिच्यातील सर्व गुण हे अनुकरणीयच आहेत.
माझे आयुष्य तिला दे असे मी कधीच म्हणणार नाही कारण ते दुःख ती पेलू शकणार नाही. देवाला मातृदिन माहीत नाही कारण हे सर्व दिन आपण माणसांनी निर्माण केले. आई वडिलांची सेवा करणारा भक्त पुंडलिक देवाला भावतो.
माझा हा केवळ शब्द प्रपंच देवाला कदापी मान्य होणार नाही. तरीही पांडुरंग चरणी मातृदिनाचे औचित्य साधून मी एकच मागणे मागते धुमाळ परिवारातील दुखाचे दिवस आता संपले आहेत. सुखाचे दिवस आले आहे. या प्रत्येक सुखाच्या क्षण असे वाढत जाऊन माझ्या आईसह तिच्या कष्टांना आता आनंदात राहू दे...
Post a Comment