पाथर्डी : कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाच्या पुढाकाराने फिरणारे पथक कोणते ही नियम न पाळता राजरोस कारभार करणाऱ्या बँकेवर दंडात्मक कारवाई करण्यास धजावत नाही. व्यापाऱ्यांना पदोपदी नियम दाखवणारे अधिकारी बँकेवर कारवाई करीत नसल्याने लोकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.
उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार शाम वाडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, पालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, पालिकेचे कर निरीक्षक सोमनाथ गर्जे, अंबादास साठे आदींच्या पथकाने गर्दीच्या ठिकाणी महामार्गावर विविध हॉटेल पुढे थांबलेल्या लोकांमध्ये विनामस्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली.
नवीन बसस्थानका समोर नव्यानेच स्थलांतरीत झालेल्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेमधील गर्दी, ग्राहकांसाठीच्या सुविधांचा व सामाजिक अंतराचा अभाव, विनामास्क ग्राहकांची गर्दी पथकाला आढळून आली. या पूर्वी मागील पंधरवाड्यात याच शाखेत असाच प्रकार घडला.
त्यावेळी याच पथकाने बँकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांना कोरोना साथ रोग व नियमांची माहिती सांगत आवश्यक त्या सूचना दिल्या. दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला. अचानक पथकाने पाहणी केली असता तशीच परिस्थिती आढळून आली.
नवीन इमारत महामार्गालगत असूनही वाहन पार्किंग सुविधा, स्वच्छतागृहाची ग्राहकांना सुविधा अशा मूलभूत सुविधा नाहीत.ग्राहकांची वाहने महामार्गावर लागून वाहतूक कोंडी होते.जागा अपुरी पडत असल्याने ग्राहक व कर्मचारी सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागतो.
भरारी पथकातर्गत पालिकेच्या पथकाने बंद काळात मागील दाराने दुकान चालवणाऱ्या व्यापाऱ्यांना भरघोस दंड केला. विनामस्क फिरणाऱ्या गोरगरिबांना दंडाची रक्कम द्यावी लागली.बॅकेत सर्व नियम पायदळी तुडवले जाऊन ही कर्तव्यदक्ष व उत्साहि अधिकारी दंडात्मक कारवाई करण्यास धजावत नसल्यबद्दल लोकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.
तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. पोलिसांना व पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यासह महसूल पथकाला रस्त्यावरील गर्दी व वाढत्या अतिक्रमनाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. नियम न पाळणाऱ्या ग्राहकांकडून फैलाव सुरू झाला असून अनलॉक नंतर आता केवळ प्रशासकीय पातळीवर कोरोनाच्या नावाखाली चाललेली धावपळ उरली आहे.
रस्त्यावर भरणाऱ्या बाजाराचे व्यवस्थापन, भरारी पथकाला अजूनही जमले नाही. प्रांताधिकाऱ्याकडून अतिक्रमणाचा बाबतीत बाळगले जाणारे मौन सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.
Post a Comment