पारनेर ः कान्हूर पठार परिसरातील ग्राहकांच्या तक्रारीनुसार सेंट्रल बँक कान्हूर पठार शाखेतील कारभार ३१ जुलै पर्यंत सुरळीत न झाल्यास टाळे ठोकण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष जितेश सरडे यांनी दिला.
सरडे यांनी आज (बुधवारी) कान्हूर पठार सेंट्रल बँक
शाखेतील शाखा अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना ग्राहकांच्या तक्रारीनुसार
निवेदन दिले. यात बँकेची शाखा दुसऱ्या मजल्यावर असल्याने अपंग व वृद्ध
ग्राहकांना शाखेत जाण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागत आहे. ही सर्वात मोठी
बाब समोर आली आहे. बँकेची शाखा अपंग व वृद्ध ग्राहकांच्या सोयीनुसार असावी,
असे या निवेदनात म्हटले आहे.
तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या कर्ज
प्रकरणांमध्ये उडवाउडवीची उत्तरे देऊन कर्ज प्रकरणे टाळण्यात येत असल्याचे
निदर्शनास आले आहे. ही प्रकरणे तात्काळ मंजूर करण्यात यावी व यापुढील
प्रकरणांमध्ये दिरंगाई करण्यात येऊ नये असेही निवेदनात म्हटले आहे. तसेच
बँकेचे एटीएम मशीन दुसऱ्या मजल्यावरील शाखेतच आहे. तेही कायम बंद असते.
हे एटीएम मशीन स्वतंत्र ठिकाणी ठेऊन 24 तास त्यातून व्यवहार सुरळीत करण्यात यावा
ही मागणीही प्रामुख्याने करण्यात आली आहे. तसेच बँकेत कर्मचारी पुरेसे
नसल्याने अनेक ग्राहकांना तासंतास ताटकळत उभे राहून पैसे न घेता खाली
हाताने मागे जावे लागत असल्याचा प्रकार पण समोर आला आहे.
वृद्धांच्या
पेन्शन, निराधारांच्या पेन्शन, शेतकऱ्यांची अनुदाने या बँकेत जमा होत असून
ते पैसे काढण्यासाठी वारंवार अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे.
बँकेच्या पासबुकवर नोंदी अनेक दिवस न झाल्याने मोठा गैरव्यवहार होऊ शकतो
अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे, या सर्वच समस्यांचे 31 जुलै पर्यंत निरसन न
केल्यास बँकेच्या कान्हूर पठार शाखेला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा जितेश
सरडे यांनी दिला आहे.
गेल्याच
आठवड्यात सरडे यांच्या नेतृत्वाखालील सेंट्रल बँकेच्या वडझिरे शाखेतही
आंदोलन करण्यात आले होते. तेथील शाखेत करोडो रुपयांचा अपहार झाले असल्याचे
उघडकीस आले आहे. वडझिरे या ठिकाणी आंदोलन केल्यावर बँकेच्या वरिष्ठ
अधिकाऱ्यांनी सरडे यांच्यासह वडझिरे येथील फसवणूक झालेल्या व तक्रार
केलेल्या ग्राहकांची बँकेच्या शाखेत भेट घेऊन सदर समस्यांचा निपटारा करणार
असल्याचे सांगितले आहे.
त्यानुसार कार्यवाही पण सुरू आहे. या आंदोलनाच्या
यशानंतर तसाच अपहार कान्हूर पठार व अन्य कोणत्याही बँकेच्या शाखेत होऊ नये व
ग्राहकांची चाललेली हेळसांड होऊ नये यासाठी सरडे यांना कान्हूर पठार सह
अनेक ठिकाणांहून संपर्क केला जात आहे. सर्वच ठिकाणी भेट देऊन त्या त्या
ठिकाणी उद्भवलेल्या समस्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सोडवीत
असल्याचे जितेश सरडे यांनी सांगितले.
यावेळी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देठे, चंद्रभान ठुबे, सचिन ठुबे, सचिन
गाडीलकर, किशोर ठुबे, कैलास लोंढे, गारगुंडी गावचे उपसरपंच प्रशांत झावरे
पाटील, सूरज नवले, श्रीकांत ठुबे, माजी उपसरपंच शिवाजी शेळके, बाळासाहेब
शिंदे, गणेश मोरे, स्वप्नील ठुबे, अक्षय ठुबे, जानकु वाव्हळ, रामदास खोदडे आदी उपस्थित होते.
Post a Comment