पाथर्डी : सर्वसामान्य भाविकांनी कष्टाने कमवलेला पैसा देवस्थान समितीकडे देणगी रूपाने जमा होतो. अशा पैशाचा विनियोग करताना विश्वस्त मंडळाने वारंवार विचार करावा. देवस्थान समितीच्या खर्चात काटकसर करून लोकसहभागातून दिल्या जाणाऱ्या सुविधा प्रभावी ठरतात, असा उपक्रम जिल्ह्यात सर्वप्रथम मोहटा देवस्थान समितीने राबविला, अशी माहिती जिल्हा न्यायाधीश अशोक भिल्लारे यांनी दिली.
न्यायाधीश भिल्लारे यांची अलिबाग येथे बदली झाल्याने त्यांना देवस्थान समितीचे अध्यक्ष या नात्याने निरोप देण्यात आला. कोरोनाचे सर्व नियम पाळून आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक आबासाहेब नागरगोजे तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक नरेंद्र बाफना, राजेंद्र शेवाळे, विश्वस्त ॲड. विजय वेलदे, अँड. सुभाष काकडे, अशोक दहिफळे, भीमराव पालवे, सुधीर लांडगे, डॉ. ज्ञानेश्वर दराडे, अस्मिता भिलारे, बबनदेवा कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे आदींसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.
पाथर्डीचे न्यायाधीश तथा देवस्थान समितीचे विश्वस्त न्यायाधीश सुशील देशमुख यांची बढतीवर बदली झाल्याने त्यांनाही याच कार्यक्रमात निरोप देण्यात आला.
भिलारे म्हणाले की, विश्वास्तांमध्ये भाविक ईश्वराचे रूप पाहतात. देवाच्या साक्षीने दानपेटीत टाकलेले दान देवाच्या साक्षीने भाविकासाठी खर्च करताना डोळ्यापुढे श्रद्धाळू भाविक आणून काम करावे.
धार्मिक स्थळांनी आता धार्मिक महत्त्व अबाधित ठेवून पर्यटनाच्यादृष्टीने आराखडा अंमलात आणावा.धार्मिक पर्यटनाकडे भाविकांचा ओढा वाढत आहे.
मोहटा देवस्थान समितीने वनविभागाची जागा मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश येऊन लवकरच देवस्थान समितीकडे मागणीप्रमाणे जमीन हस्तांतरित होणार आहे.
नजीकच्या काळात मोहटा देवस्थान राज्याच्या प्रमुख देवस्थान समितीच्या यादीत जाऊन राज्यातील भाविकांचा ओघ वाढणार आहे. अध्यक्षपदावर काम करताना अनेक वेळा देवीच्या अस्तित्वाची प्रचिती आली.
देवस्थान समितीचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ विकासकामाच्या बाबतीत सकारात्मक राहिल्याने विकासाचा वेग वाढला.
विकासकामात मोलाचे योगदान देणाऱ्या भाविकांचा देवस्थान समितीकडून सार्वजनिक स्वरूपात सन्मान झाल्यास त्याची प्रेरणा घेऊन अन्य भाविकांचा सहभाग अधिक प्रभावी ठरू शकेल.असे भिलारे म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ज्ञानेश्वर दराडे सूत्रसंचालन सुधीर लांडगे यांनी केले तर आभार प्राचार्य बाबासाहेब दहिफळे यांनी मानले.
Post a Comment