नागपूर : कोरोना काळात शाळा बंद असूनही अतिरिक्त बाबींसाठीचे शुल्क पालकांकडून वसूल करणाऱ्या शाळांविरोधात कारवाईचा सुरू करण्यात आली आहे. असा प्रकार कुठेही झाल्यास थेट फौजदारी दाखल करावी, असे निर्देश राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिले.
नागपूर विभागातील पालकांच्या तक्रारीची दखल घेत शिक्षण राज्यमंत्री कडू यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये पालकांच्या तक्रारी लक्षात घेऊन अतिरिक्त शुल्क वसूल करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा आदेश दिला.
मागील वर्षीपासून कोरोनामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याऐवजी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. असे असतानाही ज्या बाबींची सेवाच मिळालेली नाही, अशा अनेक बाबींचे शुल्क वसूल करण्यात येत असल्याच्या तक्रारी होत आहेत.
मुळात शाळाच बंद असताना असे शुल्क आकारणे बेकायदेशीर आहे. उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयाने देखील नैसर्गिक आपत्ती काळात शाळांनी अतिरिक्त शिक्षण शुल्क आकारू नये, असे निर्देश दिले आहेत. परंतु नागपूर विभागातील काही शाळा याकडे दुर्लक्ष करीत शिक्षण शुल्क वसूल करत आहेत.
नागपूर विभागातील ज्या शाळांनी पालकांकडून अतिरीक्त शिक्षण शुल्क वसुल केले, त्यांच्या विरोधात थेट फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे आता कोणत्या कोणत्या शाळांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment