पाथर्डी : पाथर्डी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने तालुक्यातील जांभळी गावाच्या हद्दीत असणाऱ्या तलावातील अनाधिकृत असणा-या पंधरा विहिरी बुजविण्याची कारवाई गुरुवारी दुपारी सुरु करण्यात आली. पाथर्डी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शीतल खिंडे व तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पालवे, पाथर्डी पंचायत समितीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता अनिल सानप यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण पाटील यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू केली आहे.
जांभळी गावातील शेतकऱ्यांनी सुरवातीला कारवाईला विरोध केला. मात्र अधिकार्यांनी ही न्यायालयीन बाब आहे. तुम्ही अडथळा करु नका, असे सांगितले. पोलिसांनी विहिरी जवळून नागरिकांना बाजूला जायला सांगितले. जांभळी गावातील तलावात अनेक शेतक-यांनी अनाधिकृत विहीरी खोदल्या आहेत.
तलावा शेजारी राहणारे अशोक रामराव आव्हाड यांनी याबाबत ग्रामपंचायत जांभळी, पंचायत समीती पाथर्डी व जिल्हा परीषद अहमदनगर यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. मात्र कारवाई होत नाही म्हणुन आव्हाड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज केला. त्यावर सुनावणी होऊन तलाावातील अनाधिकृत विहीरी बुजविण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला. त्यांनतरही विहिरी बुजविल्या गेल्या नाहीत.
आव्हाड यांनी ही बाब पुन्हा उच्च न्यायालयाच्या निर्दशनास आणुन दिली. न्यायालयाच्या तंबीनंतर जिल्हा परिषद प्रशासन जागे झाले. पाथर्डी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे व तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पालवे, पंचायत समीतीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता अनिल सानप यांच्यासह सुमारे पन्नास शासकीय कर्मचाऱ्यांचा ताफा आज जांभळी तलावात दाखल झाला.
सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण पाटील पोलिस फौजफाट्यासह दाखल झाले. सुरवातीला महिला व पुरुष शेतक-यांनी आक्रमक होत ही कारवाई करु नये असा प्रयत्न केला. प्रशासनाने शेतक-यांना विहरीतील वीजपंप काढून घेेण्यास सांगितले. डॉ. जगदिश पालवे यांनी शेतक-यांना प्रशासनाची बाजू समजून सांगितल्यानंतर आक्रमक शेतकरी, महिला शांत होऊन बाजुला झाले. विहिरी बुजविण्यासाठी प्रशासनाने चार जेसीबी मशीन उपलब्ध करून विहिरी बुजविण्यास सुरुवात झाली. गुरुवारी सांयकाळी उशीरापर्यंत कारवाई सुरूच होती.
गावातूनच तक्रार झाल्याने शेतकऱ्यांच्या विहीरी बुजविल्या जात आहेत.आम्ही उस तोडून पैसे आणले आणि विहीरीसाठी विकत जागा घेऊन विहिरी खोदल्या आणि आता त्या आमच्या डोळ्या देखत बुजविल्या जात आहेत. आमचे कष्टाचे पैसे वाया गेले मोठे नुकसान झाले आता आम्ही करायचे काय हे पाप करणा-यांना ते फेडावे लागेल अशी तळतळ उपस्थित महिला व शेतकरी व्यक्त करीत होते.
Post a Comment