गर्भगिरी बेकायदा वृक्षतोड... जिल्हास्तरीय मोबाईल स्कॉड तपासासाठी येणार..


पाथर्डी : गर्भगिरीच्या डोंगररांगेतील केळवंडी परिसरात वन विभागाच्या हद्दीत झालेल्या बेकायदा वृक्षतोडीची तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरावरील मोबाईल स्कॉड पथक आज (शुक्रवारी) तालुक्यात दाखल होणार आहे.  गर्भगिरीचा संपूर्ण डोंगर परिसर तपासला जाणार असल्याची माहिती सहायक उपवनसंरक्षक सुनील पाटील यांनी दिली.

जिल्हास्तरीय मोबाईल स्कॉड पथक गर्भगिरीच्या डोंगररांगात झालेल्या वृक्षतोडीचा तपास करून सविस्तर अहवाल सादर करेल व त्यानंतर कारवाई केली जाईल.

गर्भगिरीच्या डोंगरांगात वृक्षतोड झाल्याची माहिती देऊन पाच दिवस उलटले तरी वन विभागाकडून चौकशीच्या नावाखाली वेळकाढू धोरण अवलंबले आहे. तोडलेल्या वृक्षाच्या बुंध्यांचे जीपीएस फोटोचे, अक्षांश रेखांश देऊनही वन विभागाच्या पथकांना तोडलेली खोडे सापडत नाहीत हीआश्चर्याची गोष्ट आहे. 

स्थानिक अधिकारी अडचणीत येऊ नये तसेच गुन्ह्याची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही सर्व पुरावे दिले आहेत. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याची आमची तयारी सुरू आहे असे निसर्गप्रेमी भाऊसाहेब शिरसाट, रणजीत बेळगे व अरुण काशीद यांनी सांगितले.

दरम्यान दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा वन विभागाच्या दारात आंदोलनाचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के यांनी जिल्हा उपवनसंरक्षक श्रीमती सुवर्णा माने यांना निवेदनाद्वारे दिला आहे. अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने गर्भगिरीच्या डोंगररात वृक्षतोड झाली आहे.

तालुक्यात अनेक विनापरवाना आरा गिरण्या सुरू आहेत.त्यामुळे प्रचंड वृक्षतोड होत आहे.कागदोपत्री वृक्षलागवड दाखवून आर्थिक घोटाळा झाला आहे.तालुक्यात वृक्षतोड करून त्याची परराज्यात निर्यात होते.बेकायदा वृक्षतोड झाल्याची माहिती अनेकदा देऊनही जुजबी कारवाई केली जाते.

अनेक वर्षापासून स्थानिक कर्मचारीच नियुक्तीला असल्याने वृक्षतोड करणाऱ्या टोळ्यांशी आर्थिक लागेबांधे निर्माण झाले आहेत.गर्भगिरीच्या डोंगरांत झालेल्या वृक्षतोडीची सखोल चौकशी करून तालुक्यातील अनाधिकृत आरा गिरण्यांची तपासणी करावी व तसेच दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सोनटक्के यांनी निवेदनात दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post